शैक्षणिक

विद्यार्थीकेंद्रित शिक्षणाला बळ; बारामतीच्या टी.सी. महाविद्यालयाला डिजिटल पोडियम

आधुनिक तंत्रज्ञानातून अध्यापनाला नवी दिशा!

विद्यार्थीकेंद्रित शिक्षणाला बळ; बारामतीच्या टी.सी. महाविद्यालयाला डिजिटल पोडियम

आधुनिक तंत्रज्ञानातून अध्यापनाला नवी दिशा!

बारामती वार्तापत्र 

अनेकान्त एज्युकेशन सोसायटीच्या तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय, बारामती (Empowered Autonomous) या महाविद्यालयाला करिअर कट्टा उपक्रमांतर्गत सेंटर ऑफ एक्सलन्सच्या माध्यमातून डिजिटल पोडियम प्रदान करण्यात आले आहे. या सुविधेमुळे महाविद्यालयातील अध्यापन प्रक्रिया अधिक आधुनिक, प्रभावी आणि विद्यार्थीकेंद्रित होण्यास मदत मिळणार आहे.

पुणे येथे आयोजित करिअर कट्टा व विद्यार्थी स्टार्टअप शुभारंभ सोहळ्यात महाराष्ट्र राज्य उच्च शिक्षण विभागाचे संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांच्या हस्ते महाविद्यालयाच्या वतीने करिअर कट्टा समन्वयक सौ. सलमा शेख यांनी डिजिटल पोडियम स्वीकारले.

आधुनिक अध्यापनाला मिळणार चालना

शिक्षण क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढत असताना डिजिटल पोडियमसारख्या सुविधांमुळे अध्यापन अधिक संवादात्मक आणि परिणामकारक बनण्यास मदत होते. शिक्षकांना अध्यापनादरम्यान तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करता येणार असून, विद्यार्थ्यांना विषय समजून घेणे आणि अध्ययन प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेणे अधिक सुलभ होणार आहे.

करिअर कट्टा उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कौशल्यविकासाला, करिअरविषयक मार्गदर्शनाला आणि सर्वांगीण प्रगतीला प्रोत्साहन दिले जात आहे. त्याचबरोबर महाविद्यालयातील शैक्षणिक सुविधा अधिक सक्षम करण्यासाठीही सातत्याने प्रयत्न केले जात आहेत.

महाविद्यालयाच्या यशाबद्दल अभिनंदन

महाविद्यालयाला डिजिटल पोडियम प्राप्त झाल्याबद्दल अनेकान्त एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष जवाहर शाह (वाघोलीकर), सचिव मिलिंद शाह (वाघोलीकर), संस्थेचे पदाधिकारी व सर्व सदस्य यांनी अभिनंदन केले.

तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अविनाश जगताप, उपप्राचार्य, रजिस्ट्रार, सर्व प्राध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी या उपक्रमाचे स्वागत केले.

आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्याच्या दिशेने टाकलेले हे पाऊल महाविद्यालयाच्या शैक्षणिक प्रगतीसाठी उपयुक्त ठरणार आहे.

Back to top button