“पदवीधरांच्या हक्कांसाठी निर्णायक लढा; हर्षदा देशमुख जाधव यांचा पारदर्शक व्यवस्थेसाठी हुंकार!”
“मोठ्या शक्तींना भिडणार, सत्यासाठी लढणार!

“पदवीधरांच्या हक्कांसाठी निर्णायक लढा; हर्षदा देशमुख जाधव यांचा पारदर्शक व्यवस्थेसाठी हुंकार!”
“मोठ्या शक्तींना भिडणार, सत्यासाठी लढणार!
बारामती वार्तापत्र
पुणे विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला असून, उमेदवार हर्षदा देशमुख जाधव यांनी मतदारांच्या प्रश्नांना प्राधान्य देत पारदर्शक व्यवस्था, रोजगार, शिक्षण, भरती प्रक्रिया आणि वाढती महागाई या महत्त्वाच्या मुद्द्यांवर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. पाच जिल्ह्यांमध्ये केलेल्या प्रचार दौऱ्यादरम्यान मतदारांशी थेट संवाद साधण्याची संधी मिळाली असून, त्यांच्याकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मतदारसंघातील विविध प्रश्न समजून घेता आले, जनतेच्या अपेक्षा जाणून घेता आल्या आणि लोकप्रतिनिधी म्हणून कोणत्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतील, याची जाणीव अधिक ठळक झाल्याचे हर्षदा देशमुख जाधव यांनी सांगितले. येत्या २३ तारखेला मतांच्या माध्यमातून मतदार आपल्याला चांगला प्रतिसाद देतील, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
शिक्षणापासून भरती प्रक्रियेपर्यंत पारदर्शकतेची गरज!
सरकार आणि प्रशासकीय व्यवस्थेकडून मतदारांच्या नेमक्या अपेक्षा काय आहेत, यावर बोलताना हर्षदा देशमुख जाधव यांनी संपूर्ण व्यवस्थेत पारदर्शकता असणे अत्यंत आवश्यक असल्याचे स्पष्ट केले. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) आंदोलनांमधून समोर येणारे प्रश्न, भरती प्रक्रियेतील अडचणी आणि युवकांच्या भविष्याशी संबंधित मुद्द्यांकडे गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
शाळेपासून उच्च शिक्षणापर्यंत प्रत्येक स्तरावर पारदर्शक आणि विश्वासार्ह व्यवस्था निर्माण झाली पाहिजे. युवकांना त्यांच्या गुणवत्तेच्या आणि कर्तृत्वाच्या जोरावर संधी मिळावी, तसेच सरकारी यंत्रणा अधिक उत्तरदायी असावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
केवळ मोठमोठे प्रकल्प उभारण्यावर भर देण्यापेक्षा छोट्या प्रकल्पांचा आणि विविध योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचतो का, याकडेही लक्ष देणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. विकासाचा खरा अर्थ सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्यात असल्याची भूमिका त्यांनी मांडली.
रोजगार, शिक्षण आणि महागाईच्या प्रश्नांवर लढणार!
प्रचाराच्या अंतिम टप्प्यात मतदारांना आवाहन करताना हर्षदा देशमुख जाधव यांनी पदवीधर मतदारांनी केवळ आश्वासने देणाऱ्या नव्हे, तर त्यांचे प्रश्न प्रभावीपणे मांडणाऱ्या नेतृत्वाला संधी द्यावी, असे आवाहन केले.
रोजगाराच्या संधी, शिक्षणातील समस्या, युवकांच्या दैनंदिन अडचणी, वाढती महागाई आणि सरकारी व्यवस्थेतील पारदर्शकतेचे प्रश्न यावर सातत्याने आवाज उठवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. पदवीधर मतदारांच्या समस्या सभागृहात आणि संबंधित यंत्रणांपर्यंत पोहोचवून त्यावर उपाययोजना करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
मतदान हा संविधानाने दिलेला महत्त्वाचा हक्क असून, प्रत्येक पात्र मतदाराने मतदान प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. तसेच मतदारांनी हर्षदा देशमुख जाधव यांना पसंतीक्रमांक देऊन प्रतिनिधित्व करण्याची संधी द्यावी, अशी विनंतीही त्यांनी केली.
“लढाई सच्चाईची; जनतेच्या प्रश्नांसाठी संघर्ष सुरूच राहणार!”
निवडणुकीतील विजयाच्या शक्यतेबाबत विचारले असता, मतदारांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून जनसामान्यांचा कौल आपल्या बाजूने येईल, अशी अपेक्षा हर्षदा देशमुख जाधव यांनी व्यक्त केली. समोर कितीही मोठी राजकीय किंवा संघटनात्मक शक्ती असली, तरी आपली लढाई सत्याची आणि जनतेच्या प्रश्नांसाठी असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.
निवडणुकीत विजय मिळवण्याबरोबरच सर्वसामान्य पदवीधरांचे प्रश्न समजून घेणे, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे आणि व्यवस्थेत पारदर्शकता आणण्यासाठी सातत्याने लढणे, हे आपले प्रमुख उद्दिष्ट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पदवीधर मतदारांच्या कौलाकडे लक्ष!
पुणे विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत रोजगार, शिक्षण, भरती प्रक्रियेतील पारदर्शकता आणि युवकांच्या अपेक्षा हे मुद्दे महत्त्वाचे ठरत आहेत. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात हर्षदा देशमुख जाधव यांनी या प्रश्नांवर आपली भूमिका मांडत मतदारांना साद घातली आहे. आता मतदार त्यांच्या आवाहनाला कितपत प्रतिसाद देतात आणि मतदानातून कोणता कौल देतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.





