स्थानिक

बारामती मेडिकल कॉलेजमध्ये भावी डॉक्टरांचा सेवासंकल्प! ‘व्हाईट कोट’ समारंभात नैतिक मूल्यांचे धडे!

अधिष्ठाता डॉ. अंजली पाटील यांचा विद्यार्थ्यांना मानवता आणि संवेदनशीलतेचा संदेश; पालक-शिक्षक संघटनेची बैठकही संपन्न

बारामती मेडिकल कॉलेजमध्ये भावी डॉक्टरांचा सेवासंकल्प! ‘व्हाईट कोट’ समारंभात नैतिक मूल्यांचे धडे!

अधिष्ठाता डॉ. अंजली पाटील यांचा विद्यार्थ्यांना मानवता आणि संवेदनशीलतेचा संदेश; पालक-शिक्षक संघटनेची बैठकही संपन्न

बारामती वार्तापत्र 

वैद्यकीय शिक्षणाच्या प्रवासाची सुरुवात करताना अंगावर पांढरा शुभ्र कोट परिधान करण्याचा अभिमान आणि रुग्णसेवेची जबाबदारी स्वीकारण्याचा संकल्प अशा उत्साही वातावरणात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय, बारामती येथे प्रथम वर्षाच्या वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी ‘व्हाईट कोट’ समारंभ उत्साहात संपन्न झाला.

वैद्यकीय व्यवसायातील जबाबदाऱ्या, नैतिक मूल्ये, रुग्णसेवेचे महत्त्व आणि मानवतावादी दृष्टिकोन यांची जाणीव विद्यार्थ्यांना करून देणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.

यावेळी महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. अंजली पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना वैद्यकीय क्षेत्रात केवळ शैक्षणिक ज्ञान आणि तांत्रिक कौशल्ये पुरेशी नसून संवेदनशीलता, सहानुभूती आणि माणुसकी हीदेखील तितकीच महत्त्वाची असल्याचे सांगितले. रुग्णांच्या वेदना समजून घेणे, त्यांच्याशी आदराने संवाद साधणे आणि त्यांच्या भावनांचा सन्मान करणे ही प्रत्येक डॉक्टरची मूलभूत जबाबदारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

‘व्हाईट कोट’ हा केवळ वैद्यकीय व्यवसायाचा पोशाख नसून तो रुग्णांप्रती असलेली बांधिलकी, प्रामाणिकपणा, सेवाभाव, शिस्त आणि नैतिक जबाबदारीचे प्रतीक आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग समाजाच्या कल्याणासाठी करावा, गरीब आणि गरजू रुग्णांची सन्मानपूर्वक सेवा करावी तसेच आयुष्यभर नवनवीन गोष्टी शिकण्याची वृत्ती जोपासावी, असे आवाहनही डॉ. पाटील यांनी केले.

या कार्यक्रमासोबत आयोजित पालक-शिक्षक बैठकीमध्ये महाविद्यालयातील रॅगिंगविरोधी उपाययोजना, रॅगिंग प्रतिबंधक नियम, विद्यार्थ्यांची सुरक्षितता, तक्रार नोंदविण्याची व्यवस्था आणि महाविद्यालयात सकारात्मक व सन्मानपूर्ण वातावरण राखण्याचे महत्त्व याबाबत पालकांना माहिती देण्यात आली.

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महाविद्यालय प्रशासन आणि पालक यांच्यात नियमित संवाद व समन्वय असणे आवश्यक असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.

याचवेळी डॉ. स्नेहा साठे व त्यांच्या टीमच्या वतीने पालक-शिक्षक संघटनेची बैठकही आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीसह त्यांच्या सुरक्षिततेविषयी आणि महाविद्यालयीन वातावरणाबाबत चर्चा करण्यात आली.

कार्यक्रमास उपअधिष्ठाता (पदव्युत्तर विभाग) डॉ. नकाते, वैद्यकीय अधीक्षक डॉ. उमाप, कार्यक्रम समन्वयक डॉ. सुदके, महाविद्यालयातील प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, निवासी डॉक्टर, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

‘व्हाईट कोट’ परिधान करताना विद्यार्थ्यांनी रुग्णसेवा, मानवता, प्रामाणिकपणा आणि वैद्यकीय व्यवसायातील नैतिक मूल्ये जपण्याचा संकल्प केला. या समारंभामुळे वैद्यकीय शिक्षणाच्या नव्या प्रवासाला सुरुवात करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये रुग्णांप्रती सहानुभूती, सेवाभाव आणि व्यावसायिक जबाबदारीची भावना अधिक दृढ झाली.

 

Back to top button