स्थानिक

अजितदादांच्या लोककल्याणाचा वारसा पुढे! सुनेत्रावहिनींच्या सूचनेनुसार दिव्यांगांचे अनुदान दुप्पट!

मासिक अर्थसहाय्य दुप्पट; ६९२ लाभार्थ्यांना ८३ लाख ४ हजार रुपयांचा आधार! दिवाळीच्या प्रारंभीच खात्यात रक्कम जमा!

अजितदादांच्या लोककल्याणाचा वारसा पुढे! सुनेत्रावहिनींच्या सूचनेनुसार दिव्यांगांचे अनुदान दुप्पट!

मासिक अर्थसहाय्य दुप्पट; ६९२ लाभार्थ्यांना ८३ लाख ४ हजार रुपयांचा आधार! दिवाळीच्या प्रारंभीच खात्यात रक्कम जमा!

बारामती, दि. ३१ ऑक्टोबर २०२६ :

दिव्यांग बांधवांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्यासह त्यांना सन्मानाने आणि स्वावलंबी जीवन जगण्यासाठी आधार मिळावा, या उद्देशाने बारामती नगरपरिषदेने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. नगरपरिषदेच्या महिला व बालकल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या दिव्यांग उदरनिर्वाह भत्ता योजनेंतर्गत सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी शहरातील ६९२ पात्र दिव्यांग लाभार्थ्यांना एकूण ८३ लाख ४ हजार रुपयांचे अर्थसहाय्य वितरित करण्यात येत आहे. दिवाळीच्या प्रारंभीच लाभार्थ्यांच्या बँक खात्यांमध्ये ही रक्कम जमा होत असल्याने दिव्यांग बांधवांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे.

मासिक अनुदानात दुप्पट वाढ!

बारामती नगरपरिषदेच्या दिव्यांगांसाठी राखीव असलेल्या ५ टक्के निधीतून हे अर्थसहाय्य देण्यात येत आहे. यापूर्वी पात्र दिव्यांग लाभार्थ्यांना दरमहा ५०० रुपये, म्हणजेच वार्षिक ६ हजार रुपये अनुदान दिले जात होते. मात्र, वाढती महागाई, दैनंदिन गरजा, औषधोपचार आणि आरोग्यविषयक खर्च लक्षात घेता या अनुदानात वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.

राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रावहिनी पवार यांच्या सूचनेनुसार दिव्यांग बांधवांच्या अर्थसहाय्यात वाढ करण्याबाबत सकारात्मक भूमिका घेण्यात आली. त्यानुसार आता प्रत्येक पात्र लाभार्थ्यास दरमहा १ हजार रुपये, म्हणजेच वार्षिक १२ हजार रुपये अर्थसहाय्य मिळणार आहे. यामुळे पूर्वीच्या अनुदानात थेट दुप्पट वाढ झाली आहे.

६९२ लाभार्थ्यांना ८३ लाख ४ हजारांचा लाभ

नगराध्यक्ष सचिन सातव, उपनगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवकांच्या एकमताने बारामती नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत ठराव क्र. १४२, दिनांक २३ जून २०२६ अन्वये अनुदानवाढीस मंजुरी देण्यात आली.

या योजनेंतर्गत मागील वर्षातील पात्र ६०७ लाभार्थी आणि चालू आर्थिक वर्षात नव्याने प्राप्त झालेल्या अर्जांमधून पात्र ठरलेल्या ८५ लाभार्थ्यांचा समावेश करण्यात आला आहे. अशा एकूण ६९२ दिव्यांग लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यासाठी ८३ लाख ४ हजार रुपयांचे अर्थसहाय्य वितरित करण्यात येत आहे.

अजितदादांच्या लोककल्याणाचा विचार पुढे!

दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांना समाजातील प्रत्येक घटकाची विशेष काळजी होती. विद्यार्थी, युवक, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग बांधवांच्या प्रश्नांकडे त्यांचे नेहमीच विशेष लक्ष असायचे. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकासाचा आणि कल्याणकारी योजनांचा लाभ पोहोचावा, हा त्यांचा विचार होता.

हाच सर्वसमावेशक विकासाचा आणि लोककल्याणाचा विचार पुढे नेण्याच्या भूमिकेतून दिव्यांग बांधवांच्या अर्थसहाय्यात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

दिवाळीच्या प्रारंभीच आर्थिक आधार!

दिवाळीच्या आनंदात समाजातील प्रत्येक घटकाचा सहभाग असावा, आर्थिकदृष्ट्या गरजू नागरिकांना सणासुदीच्या काळात आधार मिळावा आणि दिव्यांग बांधवांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य फुलावे, या भावनेतून बारामती नगरपरिषदेने हा निर्णय घेतला आहे.

हा निर्णय केवळ आर्थिक मदत नसून सामाजिक बांधिलकी आणि संवेदनशील प्रशासनाचे प्रतीक ठरत आहे. दिव्यांग बांधवांचे आर्थिक सक्षमीकरण, स्वावलंबन आणि सामाजिक सन्मान जपण्यासाठी बारामती नगरपरिषद कटिबद्ध असल्याचे या निर्णयातून अधोरेखित झाले आहे.

Back to top button