स्थानिक

बारामतीत श्रायबर डेअरीतील कामगारांचा एल्गार! दोन वर्षांची वेतनवाढ रखडली; अन्नत्याग आंदोलन सुरू!

दोन वर्षांपासून वेतनवाढ रखडली; नऊ महिन्यांच्या चर्चेनंतरही तोडगा नाही! मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा!

बारामतीत श्रायबर डेअरीतील कामगारांचा एल्गार! दोन वर्षांची वेतनवाढ रखडली; अन्नत्याग आंदोलन सुरू!

दोन वर्षांपासून वेतनवाढ रखडली; नऊ महिन्यांच्या चर्चेनंतरही तोडगा नाही! मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा!

बारामती वार्तापत्र 

बारामतीतील श्रायबर डायनामिक्स डेअरीज कंपनीतील कामगारांनी प्रलंबित वेतनवाढीसह विविध मागण्यांसाठी अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. वेतनवाढ कराराची मुदत संपून दोन वर्षे उलटली, तरी कामगारांच्या प्रमुख मागण्यांवर अद्याप तोडगा निघालेला नसल्याने कामगारांमध्ये नाराजी वाढली आहे. व्यवस्थापनाच्या भूमिकेविरोधात कामगारांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला असून, मागण्या मान्य न झाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा कंपनी प्रशासनाला देण्यात आला आहे.

कामावर हजर; मात्र जेवण बंद!

कामगारांच्या म्हणण्यानुसार, वेतनवाढीसह विविध मागण्यांबाबत गेल्या नऊ महिन्यांपासून व्यवस्थापनासोबत चर्चा सुरू आहे. मात्र, या चर्चेतून अद्याप ठोस निर्णय झालेला नाही. त्यामुळे संतप्त कामगारांनी २० ऑक्टोबरपासून कामावर उपस्थित राहून जेवण न करण्याचा निर्णय घेतला आहे.

कामगारांनी काम सुरू ठेवत अन्नत्याग आंदोलन सुरू केल्याने कंपनीतील कामगार आणि व्यवस्थापन यांच्यातील प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

वेतनवाढीसह विविध मागण्यांवर तोडगा कधी?

वेतनवाढ कराराची मुदत संपून दोन वर्षे झाल्याने कामगारांच्या आर्थिक प्रश्नांबाबत तातडीने निर्णय घेण्याची मागणी करण्यात येत आहे. यासोबतच बदल्यांच्या कारवाईचा प्रश्न आणि कंत्राटी कामगारांच्या विविध समस्यांवरही व्यवस्थापनाने सकारात्मक भूमिका घ्यावी, अशी मागणी कामगार संघटनेने केली आहे.

कामगारांच्या प्रमुख मागण्यांवर व्यवस्थापनाने तातडीने चर्चा करून मार्ग काढावा, अशी भूमिका संघटनेने मांडली आहे.

मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करणार!

कामगारांच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने तोडगा काढण्यात यावा, अन्यथा आंदोलनाची तीव्रता वाढविण्यात येईल, असा इशारा कामगार संघटनेने कंपनी प्रशासनाला दिला आहे.

दरम्यान, कामगारांच्या मागण्यांवर कंपनी व्यवस्थापन काय भूमिका घेणार आणि सुरू असलेल्या अन्नत्याग आंदोलनावर तोडगा कधी निघणार, याकडे कामगारांचे लक्ष लागले आहे.

Back to top button