६४ कोटी आधीच दिले असते तर अजितदादा आज सोबत असते! सुप्रिया सुळेंचे भावनिक विधान; बारामतीत राजकीय चर्चेला उधाण!
"उशिरा का होईना, पण निर्णय चांगला आहे.

६४ कोटी आधीच दिले असते तर अजितदादा आज सोबत असते! सुप्रिया सुळेंचे भावनिक विधान; बारामतीत राजकीय चर्चेला उधाण!
“उशिरा का होईना, पण निर्णय चांगला आहे.
बारामती वार्तापत्र
बारामती विमानतळाच्या आधुनिकीकरणासाठी राज्य सरकारने ६४ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून, या निर्णयाचे खासदार सुप्रिया सुळे यांनी स्वागत केले आहे. मात्र, हा निर्णय इतक्या उशिरा का झाला, असा सवाल उपस्थित करत त्यांनी सरकारच्या कार्यपद्धतीवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. विशेष म्हणजे, या निधीचा निर्णय आधीच झाला असता तर कदाचित अजितदादा आज आपल्यासोबत असते, असे भावनिक विधान करून त्यांनी राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधले.
पत्रकारांशी बोलताना सुळे म्हणाल्या, “उशिरा का होईना, पण निर्णय चांगला आहे. मी या निर्णयाचे स्वागत करते. मात्र, हा निधी आधीच मिळाला असता तर अधिक चांगले झाले असते. कदाचित दादा आज आमच्यासोबत असते.” त्यांच्या या विधानातून बारामती विमानतळाच्या विकासासाठी निधी मिळण्यास झालेल्या विलंबाबाबतची खंत व्यक्त झाली.
दुसरीकडे, बारामती लोकसभा मतदारसंघातील दुष्काळी परिस्थितीवरूनही सुप्रिया सुळे यांनी सरकारला लक्ष्य केले. शेतकरी आर्थिक संकटात असताना वसुलीची कारवाई सुरू असल्याचे व्हिडिओ समोर येत असल्याचा आरोप त्यांनी केला. सरकारने शेतकऱ्यांकडून वसुली केली जाणार नाही, असे आश्वासन दिले असताना प्रत्यक्षात वेगळेच चित्र दिसत असल्याचे त्या म्हणाल्या.
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये नुकसानभरपाई देण्याची मागणी आपल्या पक्षाने केली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ज्या शेतकऱ्यांना अद्याप मदत मिळालेली नाही, त्यांची यादी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. प्रत्येक तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीचा आपण नियमित आढावा घेत असल्याचे त्यांनी नमूद केले.
इंदापूरमधील मतदानाच्या चोरीच्या आरोपांवरही सुळे यांनी भूमिका स्पष्ट केली. संबंधित व्हिडिओ अद्याप पाहिलेला नसला तरी तो मिळवून पुणे जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवणार असून, सक्षम अधिकाऱ्यांनी या प्रकरणात योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
एकीकडे बारामती विमानतळासाठी ६४ कोटींच्या निधीचे स्वागत, तर दुसरीकडे निधीला झालेल्या विलंबावर अजितदादांचा भावनिक संदर्भ देत व्यक्त केलेली खंत, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची व्यथा आणि इंदापूरमधील मतदानाच्या आरोपांवरून प्रशासनाकडे केलेली कारवाईची मागणी… सुप्रिया सुळे यांच्या या विधानांमुळे बारामतीच्या राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला तोंड फुटले आहे.






