स्थानिक

ग्रामीण आरोग्याला नवी दिशा! शरयु फाउंडेशनचा मोफत फिरता दवाखाना सुरू; युगेंद्र पवार यांच्या हस्ते रुग्णवाहिकेचे उद्घाटन!

विविध गावांमध्ये जाऊन नागरिकांची आरोग्य तपासणी केली जाणार आहे

ग्रामीण आरोग्याला नवी दिशा! शरयु फाउंडेशनचा मोफत फिरता दवाखाना सुरू; युगेंद्र पवार यांच्या हस्ते रुग्णवाहिकेचे उद्घाटन!

विविध गावांमध्ये जाऊन नागरिकांची आरोग्य तपासणी केली जाणार आहे

बारामती वार्तापत्र 

ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्य सुविधांसाठी शहराकडे धाव घेण्याची गरज भासू नये, तसेच गावागावांतच प्राथमिक आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी, या उद्देशाने शरयु फाउंडेशन, बारामती यांच्या वतीने तालुक्यात मोफत फिरता दवाखाना सुरू करण्यात येत आहे. या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना घराजवळच आरोग्य तपासणी आणि प्राथमिक उपचारांची सुविधा मिळणार आहे.

या उपक्रमासाठी सज्ज करण्यात आलेल्या विशेष रुग्णवाहिकेचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार पक्षाचे युवा नेते युगेंद्र पवार यांच्या हस्ते करण्यात आले.

या फिरत्या दवाखान्याच्या माध्यमातून बारामती तालुक्यातील विविध गावांमध्ये जाऊन नागरिकांची आरोग्य तपासणी केली जाणार आहे. यामध्ये रक्तदाब (बीपी), मधुमेह (शुगर) तपासणी, सामान्य आजारांवर प्राथमिक उपचार, पुढील उपचारांसाठी वैद्यकीय मार्गदर्शन आणि आरोग्यविषयक जनजागृती अशा सुविधा तज्ज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

ग्रामीण भागातील अनेक नागरिकांना आर्थिक अडचणी, वेळेचा अभाव आणि आरोग्य सुविधांची मर्यादित उपलब्धता यामुळे वेळेवर उपचार घेणे शक्य होत नाही. विशेषतः ज्येष्ठ नागरिक आणि गरजू रुग्णांना तपासणीसाठी शहरात जावे लागते. ही अडचण लक्षात घेऊन शरयु फाउंडेशनने मोफत फिरत्या दवाखान्याचा सामाजिक उपक्रम हाती घेतला आहे.

यावेळी युगेंद्र पवार यांनी बारामती तालुक्यातील नागरिकांना या मोफत आरोग्य सेवेचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन केले. नागरिकांनी स्वतःसोबतच आपल्या कुटुंबातील ज्येष्ठ नागरिक, महिला आणि गरजू व्यक्तींनाही या सुविधेचा लाभ मिळवून द्यावा, असे त्यांनी सांगितले.

‘निरोगी गाव, सुदृढ समाज’ ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्याच्या दिशेने शरयु फाउंडेशनने सुरू केलेला हा उपक्रम ग्रामीण आरोग्य व्यवस्थेसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. आता आरोग्य सेवा नागरिकांच्या दारापर्यंत पोहोचणार असल्याने बारामती तालुक्यातील ग्रामीण जनतेला या उपक्रमाचा कितपत लाभ मिळतो, याकडे लक्ष लागले आहे.

Back to top button