स्थानिक

बारामती-पणदरे एमआयडीसीच्या प्रश्नांवर मंत्रालयात बैठक होणार! उद्योगमंत्री उदय सामंत यांचे उद्योजकांना आश्वासन; प्रलंबित प्रस्ताव मार्गी लागणार?

पाणी, वीज, लॉजिस्टिक पार्क अन् ड्राय पोर्टचा मुद्दा ऐरणीवर!

बारामती-पणदरे एमआयडीसीच्या प्रश्नांवर मंत्रालयात बैठक होणार! उद्योगमंत्री उदय सामंत यांचे उद्योजकांना आश्वासन; प्रलंबित प्रस्ताव मार्गी लागणार?

पाणी, वीज, लॉजिस्टिक पार्क अन् ड्राय पोर्टचा मुद्दा ऐरणीवर!

बारामती वार्तापत्र 

बारामती आणि पणदरे औद्योगिक वसाहतीमधील उद्योजकांचे प्रलंबित प्रश्न, पायाभूत सुविधांची कमतरता आणि महत्त्वाकांक्षी औद्योगिक प्रस्तावांना गती देण्यासाठी आता उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पुढाकार घेतला आहे. बारामती इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांसमवेत मंत्रालयात लवकरच स्वतंत्र बैठक आयोजित करण्यात येईल, असे आश्वासन उद्योगमंत्र्यांनी दिले.

बारामती इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट असोसिएशनच्या शिष्टमंडळाने बारामती विमानतळावर उद्योगमंत्री उदय सामंत यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी बारामती आणि पणदरे एमआयडीसीमधील विविध औद्योगिक प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

या शिष्टमंडळात असोसिएशनचे अध्यक्ष धनंजय जामदार, सचिव अनंत अवचट, कार्यकारिणी सदस्य महादेव गायकवाड, संभाजी माने, उद्योजक राहुल लावर तसेच प्रादेशिक अधिकारी हनुमंत पाटील आणि कार्यकारी अभियंता विजय पेटकर उपस्थित होते.

पाणी, वीज, लॉजिस्टिक पार्क अन् ड्राय पोर्टचा मुद्दा ऐरणीवर!

यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष धनंजय जामदार यांनी बारामती आणि पणदरे एमआयडीसीमधील उद्योगांचे अनेक प्रश्न प्रलंबित असल्याचे उद्योगमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. औद्योगिक विकासासाठी अखंड पाणीपुरवठा आणि वीजपुरवठा अत्यंत महत्त्वाचा असून, या सुविधा सक्षम करण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली.

याशिवाय लॉजिस्टिक पार्क, ड्राय पोर्ट आणि घनकचरा व्यवस्थापन यांसारखे महत्त्वपूर्ण प्रस्तावही शासनाकडे सादर करण्यात आले आहेत. हे प्रस्ताव उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवार यांच्या माध्यमातून शासनापर्यंत पोहोचवण्यात आले असून, त्यावर आवश्यक कार्यवाही करण्याची मागणी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडे करण्यात आली.

मंत्रालयातील बैठकीकडे उद्योजकांचे लक्ष!

बारामती आणि पणदरे एमआयडीसीतील औद्योगिक प्रश्न सोडविण्यासाठी संबंधित पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मंत्रालयात बैठक घेण्याचे आश्वासन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिले आहे. त्यामुळे अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या प्रश्नांवर आता ठोस चर्चा होण्याची अपेक्षा उद्योजकांकडून व्यक्त होत आहे.

पाणी आणि वीजपुरवठ्याची समस्या, औद्योगिक पायाभूत सुविधा, लॉजिस्टिक पार्क, ड्राय पोर्ट आणि घनकचरा व्यवस्थापन या विषयांवर मंत्रालयात होणाऱ्या बैठकीत काय निर्णय होतात, याकडे बारामती व पणदरे एमआयडीसीतील उद्योजकांचे लक्ष लागले आहे.

उद्योगवाढीच्या दृष्टीने महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या या प्रस्तावांना शासनाकडून मंजुरी आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी कधी मिळणार, हा आता उद्योजकांसमोरील महत्त्वाचा प्रश्न आहे.

Back to top button