स्थानिक

बारामतीत श्रायबर कामगारांचा एल्गार! ११ युनियन एकवटल्या; पोलिसांनी रॅली रोखली, कामगारांचा संताप!

वेतनवाढीच्या करारासाठी कामगारांचा एल्गार; मोटारसायकल रॅलीला परवानगी नाकारल्याने संताप, ५ ते ६ कामगारांना ताब्यात घेतल्याचा आरोप!

बारामतीत श्रायबर कामगारांचा एल्गार! ११ युनियन एकवटल्या; पोलिसांनी रॅली रोखली, कामगारांचा संताप!

वेतनवाढीच्या करारासाठी कामगारांचा एल्गार; मोटारसायकल रॅलीला परवानगी नाकारल्याने संताप, ५ ते ६ कामगारांना ताब्यात घेतल्याचा आरोप!

बारामती वार्तापत्र 

बारामती एमआयडीसीतील श्रायबर डायनामिक्स कंपनीच्या कामगारांच्या वेतनवाढीचा प्रश्न आता चांगलाच पेटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. वेतनवाढीचा करार चर्चेतून मार्गी लावावा, या मागणीसाठी कामगारांनी आज कंपनीच्या गेटसमोर जाहीर सभा आणि भव्य मोटारसायकल रॅलीचे आयोजन केले होते. मात्र, या आंदोलनाला बारामती तालुका पोलिसांनी ब्रेक लावल्याने कामगारांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

या आंदोलनाला बारामती एमआयडीसीतील तब्बल ११ कामगार संघटनांनी पाठिंबा दिला आहे. त्यामुळे वेतनवाढीचा प्रश्न केवळ एका कंपनीपुरता मर्यादित न राहता औद्योगिक परिसरात चर्चेचा विषय बनला आहे. कामगारांनी आपल्या मागण्यांसाठी एकत्र येत आंदोलनाची तयारी केली होती.

मात्र, कायदा आणि सुव्यवस्थेचे कारण पुढे करत पोलिसांनी मोटारसायकल रॅलीला परवानगी नाकारल्याचे कामगारांचे म्हणणे आहे. याशिवाय आयोजक कामगारांना पोलीस ठाण्यात बोलावून पाच ते सहा कामगारांना ताब्यात घेतल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

कंपनीकडून अन्याय होत असतानाच आता पोलिसांच्या माध्यमातूनही आंदोलन दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचा गंभीर आरोप कामगारांनी केला आहे. त्यामुळे कामगारांच्या आंदोलनाला आता नवे वळण मिळण्याची शक्यता आहे.

वेतनवाढीचा करार चर्चेतून मार्गी लावावा, कामगारांच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घ्यावा आणि आंदोलन करण्याचा लोकशाही मार्ग रोखू नये, अशी भूमिका कामगारांकडून मांडली जात आहे.

दरम्यान, ११ कामगार संघटनांचा पाठिंबा मिळाल्याने श्रायबर कंपनीतील वेतनवाढीचा प्रश्न अधिक व्यापक होण्याची शक्यता आहे. आता कंपनी व्यवस्थापन आणि पोलीस प्रशासन या प्रकरणी काय भूमिका घेतात, तसेच कामगारांच्या मागण्यांवर तोडगा निघतो का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Back to top button