बारामती बिल्डर्स असोसिएशनचा राज्यात डंका! तीन पुरस्कारांची ऐतिहासिक कमाई; साहिल खत्री यांचा विशेष सन्मान!
सर्वोत्कृष्ट सेंटर, प्रतिमा संवर्धन उपक्रम आणि सर्वोत्कृष्ट सेंटर अध्यक्ष असे तीन मानाचे पुरस्कार!

बारामती बिल्डर्स असोसिएशनचा राज्यात डंका! तीन पुरस्कारांची ऐतिहासिक कमाई; साहिल खत्री यांचा विशेष सन्मान!
सर्वोत्कृष्ट सेंटर, प्रतिमा संवर्धन उपक्रम आणि सर्वोत्कृष्ट सेंटर अध्यक्ष असे तीन मानाचे पुरस्कार!
बारामती वार्तापत्र
बांधकाम क्षेत्रातील व्यावसायिकांची अग्रगण्य संघटना असलेल्या बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया (BAI), बारामती सेंटरने आपल्या उल्लेखनीय कार्याच्या जोरावर राज्यस्तरावर बारामतीचा नावलौकिक उंचावला आहे. सातारा येथे आयोजित BAI महाराष्ट्र राज्य पुरस्कार २०२५-२६ सोहळ्यात बारामती सेंटरला तब्बल तीन प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. या यशामुळे बारामतीच्या बांधकाम व्यावसायिकांमध्ये आनंदाचे आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
बारामती सेंटरने यंदाच्या पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट सेंटर पुरस्कार, महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट प्रतिमा संवर्धन उपक्रम पुरस्कार आणि सर्वोत्कृष्ट सेंटर अध्यक्ष पुरस्कार असे तीन मानाचे पुरस्कार पटकावले. एकाच वेळी तीन पुरस्कार मिळविण्याची कामगिरी ही बारामती सेंटरच्या सांघिक कार्याची आणि प्रभावी संघटनात्मक वाटचालीची पावती मानली जात आहे.
सातारा येथे पार पडलेल्या दिमाखदार सोहळ्यात BAI चे नॅशनल प्रेसिडेंट रवींद्र त्यागी, महाराष्ट्र बिल्डर्स असोसिएशनचे स्टेट चेअरमन प्रकाश मेंढा आणि माजी स्टेट चेअरमन जगन्नाथ जाधव यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.
सन २०२५-२६ या कालावधीत बारामती सेंटरचे अध्यक्ष म्हणून साहिल खत्री, उपाध्यक्ष सुभाष धिमान, खजिनदार दत्तात्रेय रणवरे, सेक्रेटरी आदेश वडूजकर आणि जॉईंट सेक्रेटरी जितेंद्र जाधव यांनी संघटनेची धुरा सांभाळली. या कार्यकाळात पदाधिकाऱ्यांनी सामाजिक, व्यावसायिक आणि संघटनात्मक क्षेत्रात विविध उपक्रम राबवून सभासदांना एकत्रित आणण्याचे काम केले. संस्थेची प्रतिमा उंचावणे, सभासदांचा सक्रिय सहभाग वाढविणे आणि संघटनेचे कार्य अधिक प्रभावी करणे यासाठी केलेल्या प्रयत्नांची राज्यस्तरावर दखल घेण्यात आली.
विशेष म्हणजे, बारामती सेंटरचे विद्यमान अध्यक्ष साहिल खत्री यांना सर्वोत्कृष्ट सेंटर अध्यक्ष पुरस्काराने गौरविण्यात आले. त्यांच्या नेतृत्वाखाली सेंटरने केलेल्या कामाची ही विशेष पावती ठरली आहे. तर सर्वोत्कृष्ट सेंटर आणि सर्वोत्कृष्ट प्रतिमा संवर्धन उपक्रम या पुरस्कारांनी बारामती सेंटरच्या सामूहिक कार्यावर राज्यस्तरीय मोहोर उमटवली आहे.
या पुरस्कार सोहळ्यात बारामती सेंटरच्या वतीने जीसी मेंबर्स संजय संघवी, सुभाष धिमान, अशपाक सय्यद, सुनील देशमुख आणि जितेंद्र जाधव यांनी पुरस्कार स्वीकारले.
या यशामागे बारामती बिल्डर्स असोसिएशनचे सर्व पदाधिकारी, सदस्य आणि कार्यकर्त्यांची एकजूट, मेहनत आणि सातत्यपूर्ण योगदान महत्त्वाचे ठरले आहे. हा सन्मान केवळ काही पदाधिकाऱ्यांचा नसून संपूर्ण बारामती सेंटरच्या सांघिक कार्याचा गौरव असल्याची भावना व्यक्त होत आहे.
तीन पुरस्कारांच्या माध्यमातून बारामती बिल्डर्स असोसिएशनने राज्याच्या बांधकाम क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख अधोरेखित केली असून, या यशामुळे बारामतीच्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा खोवला गेला आहे.






