इंदापूर येथील पालखी स्थळाची अप्पर जिल्हाधिकारी विजय देशमुख यांच्याकडून पाहणी
उपाय योजनांसंदर्भात घेतला आढावा

इंदापूर येथील पालखी स्थळाची अप्पर जिल्हाधिकारी विजय देशमुख यांच्याकडून पाहणी
उपाय योजनांसंदर्भात घेतला आढावा
इंदापूर : प्रतिनिधी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेली दोन वर्षे पायी दिंडी पालखी सोहळा बंद होता. यंदा मात्र शासनाने पायी वारीला परवानगी दिली आहे.त्या तयारीच्या निम्मिताने गुरुवारी (दि.१०) इंदापूर येथील पालखी स्थळाची अप्पर जिल्हाधिकारी विजय देशमुख यांनी पाहणी करून उपाययोजना करण्यासंदर्भात आढावा घेतला.
यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते,प्रांतअधिकारी दादासाहेब कांबळे,तहसीलदार श्रीकांत पाटील, पोलीस निरीक्षक तयुब मुजावर, मुख्याधिकारी रामराजे कापरे,गटविकास अधिकारी विजयकुमार परीट,कार्यकारी अभियंता अनिल ढेपे, उपअभियंता डी.बी भोसले, शाखा अभियंता अमित राजपूत,औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे गटनिधीक्षक एस.एस झणझणे,निधेक्षक अमोल भोज यांसह विविध विभागाचे अधिकारी,कर्मचारी उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना अप्पर जिल्हाधिकारी विजय देशमुख म्हणाले की,पालखी तळावरची वाहने पहिल्यांदा मार्गस्थ करण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.पालखी महामार्गाच्या रस्त्याची कामे चालू असल्यामुळे ज्या ठिकाणी रस्ता अरुंद आहे.तिथे बाजूपट्टया भरून भाविकांना काही त्रास होणार नाही या दृष्टिकोनातून प्रयत्न राहील.पिण्याच्या पाण्याच्या स्रोताची ओळख केलेली असून टँकर भरण्याच्या जागा निश्चित केल्या आहेत. पालखी येण्याच्या आठ दिवस अगोदर पाण्याचे अहवाल घेऊन कोणते पाणी पिण्यासाठी योग्य व अयोग्य आहे याची यादी तयार करून संबंधित ठिकाणी तसे फलक लावले जातील.तसेच वरकुटे तलाव भरण्याचे नियोजन असून पिण्याच्या पाण्याची कसलीही टंचाई उद्भवणार नाही.
पालखी मुक्कामाच्या ठिकाणाचा विषय सोहळा प्रमुखांचा…
जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा गेली अनेक वर्षांपासून इंदापूर शहरातील श्री.नारायणदास रामदास हायस्कूल या ठिकाणी मुक्कामी असतो. परंतु आत्ता तो औद्योगिक प्रशिक्षण संस्था या ठिकाणी करण्यात आलेल्या नवीन पालखी स्थळ येथे असेल का? याबाबत बोलताना अप्पर जिल्हाधिकारी विजय देशमुख म्हणाले की, इंदापूर शहरातील नागरिक, शहा विद्यालय आणि सोहळा प्रमुख यांचे सध्या बोलणे सुरू आहे, पालखी सोहळा प्रमुखांचा तो विषय राहील,ते जसं ठरवतील तशी सुविधा देण्याची प्रशासनाची तयारी आहे.
पालखी सोहळ्याच्या निमित्ताने उपाय योजना…
पिण्याचे पाणी, लाईट,भाविकांना राहण्याच्या खोल्या, कचरा डेपो येथे तात्पुरत्या स्वरूपाच्या उपाय योजना,
पालखी मुक्काम ठिकाणी हाईमस्ट दिवे, महिला व पुरुष यांना स्वछतागृह, रिंगण मैदान येथील नियोजन, सीसीटीव्ही कॅमेरे, पावसाच्या दृष्टिकोनातून उपाय योजना अशा विषयांवर आढावा घेण्यात आला.