बारामतीत अमृता लॉजवर मध्यरात्री छापा;५ महिलांची सुटका
वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश करत दोघांना अटक; बारामती तालुका पोलिसांची कामगिरी_ ५ महिलांची सुटका

बारामतीत अमृता लॉजवर मध्यरात्री छापा;५ महिलांची सुटका
वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश करत दोघांना अटक; बारामती तालुका पोलिसांची कामगिरी_
५ महिलांची सुटका
बारामती वार्तापत्र
बारामती-भिगवण रोडवरील अमृता लॉज (सोमनाथ हॉटेल) येथे सुरू असलेल्या अवैध वेश्या व्यवसायावर बारामती तालुका पोलिसांनी मध्यरात्री टाकलेल्या छाप्यात दोन आरोपींना अटक करण्यात आली असून पाच महिलांची सुटका करण्यात आली आहे.
१४ एप्रिल २०२६ रोजी पहाटे ३ च्या वाजण्याच्या सुमारास पोलिसांना मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार ही कारवाई करण्यात आली. पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, उपनिरीक्षक राम हरी भोसले यांच्या पथकाने बोगस ग्राहकाच्या मदतीने सापळा रचला. पंचांना सोबत घेऊन नियोजनपूर्वक अमृता लॉजवर धाड टाकण्यात आली. छाप्यादरम्यान लॉजमधील विविध खोल्यांची तपासणी करण्यात आली असता काही ठिकाणी महिला व ग्राहक एकत्र आढळून आले. चौकशीदरम्यान संबंधित आरोपी हे बाहेरून महिलांना आणून त्यांना ग्राहकांना पुरवत असल्याचे उघड झाले. ग्राहकांकडून पैशांची वसुली करून त्यातून स्वतःचा आर्थिक फायदा करून घेत असल्याचेही समोर आले. या प्रकरणात अजित जयसीन शेट्टी (वय ३८, हॉटेल चालक) व चाँद कलाम आलम (वय २०) यांना अटक करण्यात आली आहे.
या घटनेत सापडलेल्या पश्चिम बंगाल येथील ०३, भिवंडी मुंबई येथील ०२ अशा ०५ महिलांची सुटका करण्यात आली. त्यांना सुधारगृहात ठेवण्यात आले.
आरोपी दोघांनी संगनमत करून महिलांना पैशांचे आमिष दाखवत देहव्यवसाय चालविल्याचे निष्पन्न झाले आहे.
कारवाईदरम्यान पोलिसांनी बोगस ग्राहकाला दिलेल्या नोटांसह रोख रक्कम, मोबाईल फोन, कंडोम पाकिटे तसेच ग्राहकांची नोंद असलेले रजिस्टर असा सुमारे १७,८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी बारामती तालुका पोलीस ठाण्यात भा. न्याय संहिता कलम १४३(३), ३(५) तसेच अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कायदा १९५६ च्या कलम ४ व ५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक संदीप गिल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव पोलीस उपनिरीक्षक रामहरि भोसले पोलीस अंमलदार संतोष कांबळे केदारनाथ बिडवे नितीन ढवाण राजू बनणे निलेश वाकळे विठ्ठल तरंगे स्मिता गायकवाड यांच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली.






