पोटनिवडणुकीच्या प्रचाराने पवार कुटुंब एकत्र येणार?”सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
बारामतीकरांना फार सांगायची गरज नाही

पोटनिवडणुकीच्या प्रचाराने पवार कुटुंब एकत्र येणार?”सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
बारामतीकरांना फार सांगायची गरज नाही
बारामती वार्तापत्र
सुनेत्रा काकींच्या विरोधात उभे राहिलेले २२ लोक आहेत, त्यांना प्रत्येकाला एखादे दुसरे मत मिळाले तर आश्चर्य वाटायला नको. बाहेरून आलेले लोक आहेत, त्यांना शून्य मतदानही होऊ शकते.
जेवढे मतदान जास्त होईल तेवढे सर्व मतदान ९९ टक्के सुनेत्रा काकींना होईल. मतदान होईल त्यातील ९९ टक्के मतदान अजितदादांच्या पक्षाला होईल, ते दादांकडे बघून होईल, असे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी म्हटले आहे.
बारामती पोटनिवडणुकीसाठी रोहित पवारांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. रोहित पवार म्हणाले की, सर्वजण आपापल्या पद्धतीने प्रचार करत आहेत. २३ तारखेला मतदान आहे, त्यामुळे दिवस कमी आहेत. वेगवेगळ्या भागात प्रचार केला तर व्याप्ती वाढते. त्यांचा वेगळ्या बाजूचा प्रचार सुरू आहे, आमचा दुसऱ्या बाजूचा प्रचार सुरू आहे. परिवारातील इतरही लोक आपापल्या पद्धतीने प्रचार करत आहेत, अशी माहिती रोहित पवार यांनी दिली.
सुनेत्रा पवार यांना लीड कशी मिळेल यासाठी प्रत्येकाचे प्रयत्न
अजितदादांच्या प्रति असणारा आदर आणि प्रेम यासाठी लोक प्रचार करत आहेत. भावनिक नाते सोडले तर मला असे वाटते की दुसरा कुठलाही विषय नाही. अजितदादांनी अनेक लोकांना राजकारणात येण्यासाठी मदत केलेली आहे, सामाजिक दृष्टिकोन ठेवून मदत केली आहे, व्यक्तिगत मदत केली आहे. दादांकडे बघून कर्तव्य म्हणून आपण या ठिकाणी फिरत असतो. अजितदादांच्या निधनानंतर निवडणुकीच्या प्रचारासाठी इथे यावे लागत आहे, हे दुर्दैव आहे. या ठिकाणातून सुनेत्रा पवार यांना लीड कशी मिळेल यासाठी प्रत्येक व्यक्ती प्रयत्न करत आहे, असे रोहित पवार म्हणाले.
दरम्यान, अजितदादा गेल्यानंतर बारामतीची पोटनिवडणूक होत आहे, काकी सुनेत्रा पवार उभे आहेत. बारामतीकरांना फार सांगायची गरज नाही, त्यांना काय करायचे हे माहित असते. अजितदादांच्या कार्याकडे बघून शंभर टक्के मतदान प्रत्येक गावातून सुनेत्रा पवार यांना व्हावे ही विनंती करत आहे, असे आवाहन रोहित पवारांनी केले.






