कितीही मोठ्या बापाचा मुलगा असला तरीही कायदा त्याला दाखवा;अजितदादांचा कडक इशारा
तुम्हीही ‘असा’ व्हॉट्सअॅप ग्रुप तयार केलाय का?

कितीही मोठ्या बापाचा मुलगा असला तरीही कायदा त्याला दाखवा;अजितदादांचा कडक इशारा
तुम्हीही ‘असा’ व्हॉट्सअॅप ग्रुप तयार केलाय का?
बारामती वार्तापत्र
बारामतीत एका शाळेत एकमेकांकडे पाहाण्यावरून मुलांनी मारामारी केली, कितीही मोठ्या बापाचा मुलगा असला तरीही कायदा त्याला दाखवा. पोलिसांनी मोठ्या बापाचा मुलगा असला म्हणून हयगय करू नये. अलीकडे कॅफेचा नवीन पायंडा पडला आहे, कॅफेत काहीही वेडेवाकडेपणा चालतो. लक्षात घ्या काळ कोणासाठी थांबत नाही. शाळेत शिकणारी मुले काही ना काही चुकीचे करतात, मी त्या शिक्षण संस्थेचे नाव घेत नाही. एकमेकांकडे का बघितलं म्हणून भांडणं होतात कोयत्याने देखील वार केले जातात, हे प्रकार थांबले पाहिजेत. मी पोलिसांना सांगितले आहे, की अशा प्रकरणात कोणाचेही लाड करू नका, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले की, पोलीस खात्याने शक्ती अभियान सुरू केले आहे. खऱ्या अर्थाने कोण चुकत असेल तर तो कितीही मोठ्या बापाचा पोरगा असेल, पोरगी असेल तर हयगय करू नका सगळ्यांना कायदा नियम सारखा आहे. शक्ती अभियानाच्या माध्यमातून आम्ही यावर लक्ष केंद्रित केलं आहे. शक्ती अभियानाच्या संपर्क नंबर वर कोणीही गंमत म्हणून फोन करू नका. आम्हाला जर कळलं की गंमत म्हणून फोन केला तर त्याची अशी गंमत करीन की त्याच्या दहा पिढ्या आठवणीत राहील.
काही मुलांनी नो कॉम्प्रोमाइज ग्रुप अशा पद्धतीने व्हॉट्सअॅप ग्रुप आणि इन्स्टाग्राम ग्रुप तयार केले आहेत, ते लगेच बंद करा. मुलांनो जर तुम्ही चुकीच्या रस्त्यानं गेलात तर अलिकडे काहीही शोधता येतं. त्यामुळे अशा गोष्टींना अजिबात थारा देऊ नका. लहान वयात कधीकधी मुला मुलींचा पाय घसरतो कृपा करून आपण आपल्या आई वडिलांना कमीपणा वाटेल असं कृत्य करू नका. तुमच्यावर राज्याचे, देशाचे भवितव्य अवलंबून आहे. तुम्ही उद्या देशाचे जबाबदार नागरिक बनणार आहात. तुम्हाला देशाला पुढे न्यायचं आहे असं अजित पवार यांनी यावेळी म्हटलं आहे.