बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक जाहीर; पवार, तावरे गुरू-शिष्य एकत्र येणार का?
युगेंद्र पवार यांच्या भूमिकांकडे लक्ष

बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक जाहीर; पवार, तावरे गुरू-शिष्य एकत्र येणार का?
युगेंद्र पवार यांच्या भूमिकांकडे लक्ष
बारामती वार्तापत्र
बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. बुधवार दि. २१ मे ते २७ मे या कालावधीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. तर २२ जून रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी प्रकाश अष्टेकर आणि माळेगावचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. यशवंत माने यांनी हा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे.
विद्यमान सत्ताधार्यांविरोधात असलेले सहकारमहर्षी चंद्रराव तावरे व रंजन तावरे या गुरू-शिष्याच्या विरोधी गटाकडून कोणत्याच प्रकारची हालचाल दिसून येत नाही. हे दोन्ही नेते भाजपचे असल्याने सध्याच्या अजित पवार गटाविरोधात भूमिका घ्यायची किंवा कसे, यावर खलबते सुरू असल्याचे समजते त्यामुळे विरोधकांची भूमिका गुलदस्तात असल्याचे चित्र आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार यांच्या गटाकडून युगेंद्र पवार यांच्या नेतृत्वात ऊस उत्पादक शेतकरी सभासदांच्या अडीअडचणींना न्याय देण्याची भूमिका घेत निवडणूक लढण्याची तयारी सुरू असल्याचे चित्र आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना तसेच कष्टकरी शेतकरी समिती यांनी देखील निवडणूक लढण्याच्या तयारीने शेतकरी सभासदांच्या गाठीभेटी घेण्यास सुरुवात केल्याचे पाहावयास मिळत आहे.
एकूणच, माळेगाव साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये सध्यातरी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, चंद्रराव तावरे व रंजन तावरे गुरू-शिष्य गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार गट, स्वाभिमानी शेतकरी संघटना, कष्टकरी शेतकरी समिती यांच्या माध्यमातून निवडणुकीच्या अनुषंगाने पॅनल होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे सभासदांमध्ये किती व कोणते पॅनल होणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. निवडणुकीचा बिगुल कोणत्याही क्षणी वाजू शकतो, त्यामुळे मागील दोन-तीन दिवसांपासून सत्ताधारी संचालक मंडळाने कार्यक्षेत्रात गटनिहाय सभा तथा बैठका घेत प्रचारास सुरुवात केली आहे. माळेगाव कारखाना हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अधिपत्याखाली आहे. त्यांच्या सूचनेनुसार अध्यक्ष अॅड. केशवराव जगताप व बाळासाहेब तावरे यांच्या मार्गदर्शनाखाली सत्ताधारी संचालक मंडळाने कार्यक्षेत्रातील गटनिहाय बैठका सुरू केल्या आहेत.
अजित पवार, तावरे गुरू-शिष्य एकत्र येणार का?
राज्यात महायुतीचे सरकार असल्याने कदाचित उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपचे चंद्रराव तावरे व रंजन तावरे हे गुरू-शिष्य या निवडणुकीत एकत्र येतील? अशी सभासदांमध्ये चर्चा आहे. कारखान्याच्या मागील निवडणुका पाहता चंद्रराव तावरे व रंजन तावरे यांनी पक्षविरहित निवडणुका लढल्याचा इतिहास असल्याने उत्सुकता कायम आहे.