बारामती बँकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये आचारसंहितेचा भंग!
निवडणूक निर्णय अधिकारी कोणती भूमिका घेणार याकडे सर्व सभासदांचे लक्ष

बारामती बँकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये आचारसंहितेचा भंग!
निवडणूक निर्णय अधिकारी कोणती भूमिका घेणार याकडे सर्व सभासदांचे लक्ष
बारामती वार्तापत्र
बारामती येथील बारामती सहकारी बँकेची सर्वसाधारण सभा आज संपन्न झाली. या सभेमध्ये तिघा व्यक्तींनी थेट बँक कोणाच्या नेतृत्वाखाली चालते, त्यांच्यामुळे डिव्हीडंड मिळतो असे वक्तव्य करून आदर्श आचारसंहितेचा भंग केला आहे.
बारामती बँकेच्या सर्वसाधारण सभेला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार दरवर्षीप्रमाणे येत असतात. मात्र विधानसभा निवडणूकीच्या व्यस्त कामातून त्यांना सदर सभेला उपस्थित राहता आले नाही. त्याचे पडसाद सभासदांच्या उपस्थितीतून दिसून येत होते.
सभेच्या सुरूवातीला बँकेचे अध्यक्षांनी अध्यक्षीय भाषण केले. बँकेच्या कार्याबाबत सविस्तर वृत्तांत मांडला. बँकेचे कार्यकारी संचालक रविंद्र बनकर यांनी अहवाल वाचन केले. यावेळी विविध सभासदांनी सूचना मांडल्या.
यावेळी पोपटराव ढवाणपाटील, देवकाते व सुरेंद्र गादीया यांनी थेट अजित पवार यांचे नाव घेत बँक अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली चालत आहे. उद्या त्यांच्या प्रचाराचा नारळ फोडण्याचा कार्यक्रम आहे या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित रहावे. असा विकासपुरूष मिळणे अशक्य आहे असे सांगितले.
विधानसभा निवडणूकीची आचारसंहिता सुरू असताना या वरील लोकांनी असे वक्तव्य करून आचारसंहितेचा भंग केलेला आहे.
बँकेच्या हिताबाबत दिलीप शिंदे यांनी कामगारांना हक्काच्या सुट्ट्या दिल्या जात नाही. पगार कमी आहेत असे विविध कामगारांचे प्रश्र्न मांडले. बुरूंगले यांनी डिव्हीडंड, नफा कमी मिळाला, निर्लेखन इ. विषयांबाबत सविस्तर विषय मांडले. तैनुर शेख यांनी अहवालात मांडलेल्या चुकांबाबत सविस्तर माहिती रविंद्र बनकर यांनी यावेळी दिली.
बारामती बँकेच्या मुख्य शाखेच्या परिसरात बारामती नगरपरिषदेची परवानगी न घेता बेकायदेशीर बांधकाम केले आहे. कामगार कल्याण निधी गेली 15 वर्षापासुन तेवढाच ठेवण्यात आलेला आहे. या सभेमध्ये आचारसंहितेचा भंग झालेला आहे. या सर्व विषयांबाबत विरोधक आक्रमक भूमिका घेणार का? या सर्व सभेचे चित्रीकरण बारामती वार्तापत्राने केलेले आहे. आचारसंहितेवर निवडणूक निर्णय अधिकारी कोणती भूमिका घेणार याकडे सर्व सभासदांचे लक्ष लागून राहिलेले आहे.