राजकीय

शरद पवार अ‍ॅक्शन मोडवर बोलावली कुटुंबाची बैठक

सुनेत्रा पवारही मुंबईत आहेत

शरद पवार अ‍ॅक्शन मोडवर बोलावली कुटुंबाची बैठक

सुनेत्रा पवारही मुंबईत आहेत

बारामती वार्तापत्र 

उपमुख्यमंत्री, दिवंगत अजित पवार यांच्या निधनानंतर पवार कुटुंब पहिल्यांदाच पुण्यात एकत्र येणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ( शरदचंद्र पवार ) अध्यक्ष शरद पवार यांनी पुण्यात पवार कुटुंबाची बैठक बोलावली आहे.

स्नेहभोजनाच्या निमित्ताने पवार कुटुंब हे मोदी बाग येथे एकत्र येणार आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. अलीकडेच शरद पवारांना रूग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. त्यानंतर शरद पवारांनी मोदीबागेत पवार कुटुंबाला एकत्र बोलावलं आहे.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, खासदार सुप्रिया सुळे, राजेंद्र पवार, श्रीनिवास पवार, इंद्रजित पवार, आमदार रोहित पवार, खासदार पार्थ पवार, युगेंद्र पवार यांना शरद पवारांनी मोदी बाग येथे बोलावलं आहे. जय पवार हे परदेशात असल्याने उपस्थित राहू शकणार नाहीत.

सुनेत्रा पवारही मुंबईत आहेत. त्यामुळे आता कोण-कोण उपस्थित राहणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. स्नेहभोजनाच्या निमित्ताने पवार कुटुंब एकत्र येत असले तरी राजकीय चर्चा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. बारामतीच्या पोटनिवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीने सुनेत्रा पवारांना पाठिंबा जाहीर केला होता. तसेच, रोहित पवारांनी अनेक ठिकाणी सुनेत्रा पवारांसाठी बैठक सुद्धा घेतल्या होत्या. दुसरीकडे सुप्रिया सुळेंनी बारामतीत सुनेत्रा पवारांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेल्या महायुतीच्या मेळाव्याला देखील उपस्थित लावली होती.

त्यातच जय पवार बोलून गेले होते की, ‘लोकांची इच्छा आहे, मी २०२९ मध्ये बारामतीतून विधानसभा निवडणूक लढवावी.’ त्यावर रोहित पवारांनी म्हटलं होते की, ‘२०२९ मध्ये पवार विरुद्ध पवार,’ अशी निवडणूक होऊ शकते. मात्र, युगेंद्र पवारांनी यास स्पष्ट नकार देत, ‘पवार विरुद्ध पवार, अशी निवडणूक होऊ नये,’ असे बोलून दाखवलं होते. त्यामुळे या बैठकीत २०२९ मधील निवडणूक, राष्ट्रवादीचे विलीनीकरण आणि विविध विषयांवर चर्चा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

तसेच, सुप्रिया सुळे यांची मुलगी रेवती सुळे यांचे लग्न ठरलं आहे. त्यानिमित्त स्नेहभोजनाचा कार्यक्रम आहे, अशी देखील माहिती मिळत आहे. बैठकीत अजून कुठल्या मुद्यांवर चर्चा होऊ शकते? मध्यंतरी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाची चर्चा होती. त्या संदर्भात सुद्धा या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

रोहित पवार, पार्थ पवार, युगेंद्र पवार या बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. राजेंद्र पवार आणि श्रीनिवास पवार सुद्धा या बैठकीला येऊ शकतात. श्रीनिवास पवार हे अजित पवार यांचे सख्खे बंधु तर राजेंद्र पवार हे चुलत बंधू आहेत. कौटुंबिक विषयासह राजकीय विषयांवर चर्चा होऊ शकते. या बैठकीनंतर पवार कुटुंबातील एखादा सदस्य बाहेर येऊन माध्यमांशी बोलू शकतो.

श्रीनिवास पवार यांनी काय उत्तर दिलेलं? मतदानाच्या दिवशी श्रीनिवास पवार यांना भाजप अशा पद्धतीने पवार कुटुंबात राजकारण लावून देतय का? असा प्रश्न विचारण्यात आलेला. त्यावर श्रीनिवास पवार यांनी “भाजपला बदनाम करण्यात काय उपयोग? तुम्हाला तुमचं स्वत:च कळत नाही. पवार कुटुंब राजकारणातलं एवढं जुनं कुटुंब आहे. तुम्हाला ते समजलं पाहिजे” असं उत्तर दिलेलं.

Back to top button