स्थानिक

हॉल ते मॉल : बारामती, इंदापूर , दौंड व पुरंदर तालुक्यातील महिलांच्या स्वप्नांना नवे पंख..!

हजारो महिलांच्या स्वप्नांना उंच भरारी देणारा प्रेरणादायी प्रवास

हॉल ते मॉल : बारामती, इंदापूर , दौंड व पुरंदर तालुक्यातील महिलांच्या स्वप्नांना नवे पंख..!

हजारो महिलांच्या स्वप्नांना उंच भरारी देणारा प्रेरणादायी प्रवास

बारामती वार्तापत्र 

ग्रामीण भागातील महिलांच्या कष्टाला योग्य बाजारपेठ मिळाली, तर त्या केवळ कुटुंबालाच नाही तर संपूर्ण अर्थव्यवस्थेला बळ देऊ शकतात, याचे प्रेरणादायी उदाहरण बारामती परिसरात पाहायला मिळत आहे. एग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या विश्वस्त सचिव सुनंदा पवार यांच्या पुढाकारातून “हॉल ते मॉल” ही अभिनव संकल्पना साकारत आहे.

बारामती, इंदापूर, दौंड आणि पुरंदर या चार तालुक्यांतील महिला बचत गटांना आर्थिक सक्षमीकरणाच्या दिशेने नेण्यासाठी सुनंदा पवार यांनी आधी “गाव तिथे उद्योजक” ही संकल्पना राबवली. भीमथडी जत्रेच्या माध्यमातून महिलांच्या हस्तनिर्मित उत्पादनांना राज्यभर ओळख मिळवून दिली.

आता त्याच पुढच्या टप्प्यात “घरातील हॉलमधून तयार झालेले उत्पादन थेट मॉलपर्यंत” पोहोचवण्याचा ध्यास त्यांनी घेतला आहे. या उपक्रमांतर्गत तब्बल 21 टन उन्हाळी उत्पादनांचे करार महिला बचत गटांमार्फत करण्यात आले आहेत. त्यातील पहिला टप्पा म्हणून दहा टनांपर्यंत उत्पादन महिला बनवून देत आहेत. त्यापैकी दीड टन मालाचा पहिला ट्रक शारदानगर येथून रवाना करण्यात आला.

यावेळी 8 बचत गटांनी तयार केलेले 118 बॉक्स कंपनीकडे पाठवण्यात आले, हा क्षण महिलांसाठी आत्मविश्वास वाढवणारा ठरला. शारदा महिला संघाच्या माध्यमातून 21 हजारांहून अधिक महिलांना स्वावलंबी बनवण्याचा संकल्प यामागे आहे. आर्थिक, सामाजिक आणि कौटुंबिक सक्षमीकरणाचा विचार करत विविध उपक्रम राबवले जात आहेत.

महिलांनी तयार केलेल्या उत्पादनांना बाजारपेठ मिळावी यासाठी कंपन्या व संस्थांशी सातत्याने संपर्क साधून रोजगाराच्या संधी निर्माण केल्या जात आहेत. संतकृपा महिला गृह उद्योग, पुणे यांच्यासोबत झालेल्या सहकार्यामुळे महिलांच्या उत्पादनांना मोठी संधी मिळाली आहे.

सॅम्पल टेस्टिंगनंतर कंपनीने निवडलेली उत्पादने तयार करण्याची जबाबदारी बचत गटांना देण्यात आली असून, 30 मेपर्यंत ही मोठी ऑर्डर पूर्ण करायची आहे. यावेळी सुनंदा पवार म्हणाल्या, “महिलांनी घरातून तयार केलेले उत्पादन शहरातील मॉलपर्यंत पोहोचावे, हा माझा प्रयत्न आहे.

महिलांच्या हाताला बाराही महिने काम मिळावे आणि त्यांच्या कुटुंबाला आर्थिक आधार मिळावा, यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत.” ग्रामीण महिलांच्या हाताला काम, उत्पादनाला बाजारपेठ आणि कुटुंबाला आधार देणारा हा “हॉल ते मॉल” उपक्रम केवळ योजना नसून, हजारो महिलांच्या स्वप्नांना उंच भरारी देणारा प्रेरणादायी प्रवास ठरला आहे.

एग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे प्रमुख राजेंद्रदादा पवार, विश्वस्त सचिव सौ सुनंदाताई पवार, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश नलावडे, संस्थेचे समन्वयक प्रशांत तनपुरे, मनुष्यबळ संसाधन अधिकारी गार्गी दत्ता यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व बचत गटांच्या उत्पादनाचे नियोजन शारदा महिला संघाचे विभाग प्रमुख बाळासाहेब नगरे, तात्यासाहेब शेलार, प्रकाश साळुंखे, अभिषेक जगताप, निकिता महामुनी, गजानन मोकाशी, बाबासाहेब भोंग, स्नेहा मसुगडे, सीमा पानसरे आदींनी केले.

Back to top button