शिवसेनेची ऑफर धुडकावली? संभाजीराजे छत्रपती कोल्हापूराकडे रवाना
शिवसनेचे नेते संजय राऊत यांनी संभाजीराजेंसोबत फोनवरुन चर्चा केली होती.

शिवसेनेची ऑफर धुडकावली? संभाजीराजे छत्रपती कोल्हापूराकडे रवाना
शिवसनेचे नेते संजय राऊत यांनी संभाजीराजेंसोबत फोनवरुन चर्चा केली होती.
मुंबई,प्रतिनिधी
संभाजीराजे छत्रपती शिवसेनेत प्रवेश करणार नाहीत. शिवसेनेच्या निमंत्रणाकडे संभाजीराजे पाठ फिरवली असून आज पहाटेच ते कोल्हापूरकडे रवाना झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राज्यसभेच्या उमेदवारीसाठी शिवसेना प्रवेशाची अट संभाजीराजे यांना घालण्यात आली आहे.
त्यांना शिवसेना पुरस्कृत उमेदवार म्हणून राज्यसभेची निवडणूक लढवण्यात कोणताही रस नाही. त्यामुळे संभाजीराजे छत्रपती यांनी शिवसेनेचा प्रस्ताव जवळपास धुडकावल्यात जमा आहे. कारण संभाजीराजे यांचे मुंबईत असणारे कार्यकर्ते आपापल्या गावी निघून गेले आहेत. संभाजीराजे शिवसेनेत प्रवेश करणार असते तर कार्यकर्ते मुंबईतच थांबले असते. मात्र, या सगळ्या घडामोडी पाहता संभाजीराजे यांनी शिवसेनेची ऑफर धुडकावून लावल्याची चर्चा आहे.
कालच शिवसेना नेत्यांच्या शिष्टमंडळाने ट्रायडंट हॉटेलमध्ये जाऊन संभाजीराजे छत्रपती यांची भेट घेतली होती. या शिष्टमंडळात अनिल देसाई, मिलिंद नार्वेकर आणि उदय सामंत यांचा समावेश होता. या तिन्ही नेत्यांनी संभाजीराजे छत्रपती यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांना मातोश्रीचा निरोप दिला होता. उद्या दुपारी १२ वाजता शिवबंधन बांधायला मातोश्रीवर या, असा निरोप उद्धव ठाकरे यांनी संभाजीराजे यांना पाठवाला होता. मात्र, आता संभाजीराजे यांनी शिवसेनेचा हा प्रस्ताव नाकारल्याची माहिती आहे. त्यामुळे आता शिवसेना सहाव्या जागेसाठी आपला उमेदवार जाहीर करणार का आणि काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते प्रत्यक्ष निवडणुकीवेळी त्याला मत देणार का, हे पाहावे लागेल.
मराठा मोर्चा समन्वयकांशी चर्चा करुन निर्णय घेणार
शिवसेनेची ही ऑफर नाकारल्यानंतर संभाजीराजे छत्रपती मराठा मोर्चाच्या सर्व समन्वयकांशी चर्चा करणार असल्याची माहिती आहे. मराठा मोर्चा समन्वयकांनी आज पुण्यामध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांची भेट घेतली होती. त्यावेळी संभाजीराजेंच्या उमेदवारीला पाठिंबा द्यावा अशीही मागणी त्यांनी शरद पवार यांच्याकडे केली होती. राज्यसभेच्या सहा जागांसाठी 10 जूनला निवडणूक होणार आहे. संभाजीराजे छत्रपती यांनी शिवसेनेची उमेदवारी स्विकारुन निवडणूक लढवावी, असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं होतं. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून शिवसेना संभाजीराजे छत्रपतींना राज्यसभेसाठी उमेदवारी देणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं.