अजितदादांच्या स्मारकावर नगरसेवकांत श्रेयवाद; वादग्रस्त वक्तव्यावेळी मात्र बहुतेकांची शांतता!
उर्वरित बहुतांश नगरसेवकांनी मौन बाळगल्याची चर्चा

अजितदादांच्या स्मारकावर नगरसेवकांत श्रेयवाद; वादग्रस्त वक्तव्यावेळी मात्र बहुतेकांची शांतता!
उर्वरित बहुतांश नगरसेवकांनी मौन बाळगल्याची चर्चा
बारामती वार्तापत्र
महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांच्या स्मारक उभारणीच्या विषयावर बारामती नगरपरिषदेत श्रेय घेण्यासाठी नगरसेवकांमध्ये चढाओढ सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे. स्मारक उभारणीबाबत विचारविनिमय, ठराव आणि त्याचे श्रेय कोणाला मिळणार यावर अनेक नगरसेवक सक्रिय झाल्याचे सभागृहातील चर्चेतून स्पष्ट झाले.
मात्र, याच अजितदादांबाबत काही दिवसांपूर्वी करण्यात आलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या प्रकरणात नगरसेवकांची भूमिका मात्र वेगळीच दिसून आली. त्या वेळी केवळ तीन नगरसेवकांनी उघडपणे पुढे येत निषेधाची भूमिका घेतली होती. उर्वरित बहुतांश नगरसेवकांनी मौन बाळगल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
त्यामुळे आता स्मारकाच्या विषयावर अचानक दाखविली जात असलेली आक्रमकता आणि त्यावेळची शांतता यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. “अजितदादांबद्दल प्रेम आणि आदर व्यक्त करण्यासाठी केवळ स्मारकाच्या ठरावापुरतेच मर्यादित न राहता, त्यांच्या सन्मानावर आघात झाल्यावरही ठाम भूमिका घेणे अपेक्षित होते,” अशी भावना काही नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
स्मारक उभारणीच्या प्रस्तावाला सर्वसाधारण पाठिंबा असला तरी त्याच्या निमित्ताने सुरू झालेला श्रेयवाद आता चर्चेचा विषय ठरत आहे. राजकीय निरीक्षकांच्या मते, अजितदादांच्या कार्याचा गौरव करण्यापेक्षा स्मारकाच्या प्रस्तावाचे राजकीय भांडवल करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची टीका विरोधकांकडून केली जात आहे.
यामुळे “स्मारकासाठी पुढाकार की श्रेयासाठी स्पर्धा?” असा प्रश्न उपस्थित होत असून, बारामतीच्या राजकारणात या विषयावर नव्या चर्चेला तोंड फुटले आहे.






