सुनेत्रा पवार वादानंतर बारामतीतील राजकीय वाद अधिक चिघळला; नगराध्यक्षांनी माफी मागावी, काँग्रेसची भूमिका

सुनेत्रा पवार वादानंतर बारामतीतील राजकीय वाद अधिक चिघळला; नगराध्यक्षांनी माफी मागावी, काँग्रेसची भूमिका
पोस्टचा पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी कोणताही संबंध नसताना त्यांच्या विरोधात आंदोलन
बारामती वार्तापत्र
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबाबत सोशल मीडियावर करण्यात आलेल्या ‘गुंगी गुडिया’ या वादग्रस्त पोस्टनंतर बारामतीतील राजकीय वातावरण अधिकच तापले आहे.
या प्रकरणाच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कार्यकर्त्यांनी बारामतीत आंदोलन करत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध व्यक्त केला होता.
या आंदोलनावर आता काँग्रेसने तीव्र आक्षेप नोंदवत संबंधितांकडून जाहीर माफीची मागणी केली आहे.
काँग्रेसच्या भूमिकेनुसार, ‘गुंगी गुडिया’ हा उल्लेख काँग्रेसच्या अधिकृत एक्स (ट्विटर) हँडलवरून करण्यात आला होता.
मात्र, त्या पोस्टचा पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी कोणताही संबंध नसताना त्यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.
काँग्रेसने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “पृथ्वीराज चव्हाण यांनी स्वतः असे कोणतेही वक्तव्य केलेले नसताना त्यांच्या प्रतिमेचा निषेध करणे ही राजकीय दिवाळखोरी आहे.
या घटनेची आम्ही गंभीर दखल घेतली असून संबंधित पदाधिकाऱ्यांनी तत्काळ जाहीर माफी मागावी.”काँग्रेसने पुढे स्पष्ट केले की, “आम्ही उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा आदर करतो.
मात्र, नगराध्यक्षांचा मोठा राजकीय वारसा असून त्यांनी अशा प्रकारच्या घटनांना प्रोत्साहन मिळू न देणे अपेक्षित होते. त्यांनी मोठ्या मनाने काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांची जाहीर माफी मागावी,” अशी मागणी करण्यात आली आहे.
या घडामोडींमुळे बारामतीतील राजकीय वातावरण आणखी तापले असून, या प्रकरणावर पुढे कोणती राजकीय प्रतिक्रिया उमटते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






