स्थानिक

बारामतीत आयएमआयच्या सेवा बंद आंदोलनाला प्रतिसाद

तालुक्यात उद्या अनेक रुग्णालये राहणार बंद

बारामतीत आयएमआयच्या सेवा बंद आंदोलनाला प्रतिसाद

तालुक्यात उद्या अनेक रुग्णालये राहणार बंद

बारामती वार्तापत्र

इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) बारामती शाखेच्या वतीने सुरू असलेल्या ‘सेवा बंद आंदोलनाला’ बारामती शहरातील डॉक्टरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.

डॉक्टरांच्या सुरक्षिततेसाठी कठोर कायदेशीर संरक्षण, सन्मान आणि सुरक्षित कार्य वातावरणाची मागणी करत शहरातील अनेक डॉक्टरांनी या आंदोलनात सहभाग नोंदवला आहे.

आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बारामतीतील ज्येष्ठ नागरिक संघाच्या सभागृहात डॉक्टरांची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत उद्या मुंबई येथे होणाऱ्या राज्यस्तरीय आंदोलनात सहभागी होण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार, उद्या बारामतीतील अनेक डॉक्टर आपली नियमित रुग्णसेवा बंद ठेवून आंदोलनात सहभागी होणार असल्याची माहिती देण्यात आली.

सेवा बंद आंदोलन सुरूच… आमची सेवा, आमचा स्वाभिमान असा संदेश देत डॉक्टरांनी अलीकडील काळात डॉक्टरांवर होत असलेल्या वाढत्या हल्ल्यांचा तीव्र निषेध व्यक्त केला आहे. आरोग्यसेवा देणाऱ्या डॉक्टरांच्या सन्मानाचे रक्षण व्हावे, तसेच त्यांच्या सुरक्षिततेसाठी शासनाने प्रभावी कायदेशीर संरक्षण द्यावे, अशी प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली.

या आंदोलनामुळे आपत्कालीन सेवा वगळता नियमित ओपीडी आणि इतर सेवा काही प्रमाणात प्रभावित होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी संबंधित रुग्णालय किंवा दवाखान्याशी संपर्क साधूनच भेट द्यावी, असे आवाहन आयएमए बारामती शाखेच्या वतीने करण्यात आले आहे.

दरम्यान, मुंबईतील आंदोलनानंतर आयएमए बारामती शाखेचे पदाधिकारी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेऊन आपल्या विविध मागण्यांचे निवेदन सादर करणार असल्याची माहितीही संघटनेच्या वतीने देण्यात आली आहे.

Back to top button