बारामती आरटीओकडून बेवारस वाहनधारकांना अंतिम इशारा; १० दिवसांत वाहने न नेल्यास होणार जाहीर लिलाव
सुमारे १५० वाहने अद्याप संबंधितांनी ताब्यात घेतलेली नाही

बारामती आरटीओकडून बेवारस वाहनधारकांना अंतिम इशारा; १० दिवसांत वाहने न नेल्यास होणार जाहीर लिलाव
सुमारे १५० वाहने अद्याप संबंधितांनी ताब्यात घेतलेली नाही
बारामती वार्तापत्र
उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या परिसरासह इंदापूर, दौंड एस टी डेपो परिसरात व इतर ठिकाणी दीर्घकाळापासून जप्त व बेवारस अवस्थेत उभी असलेल्या वाहनांबाबत वाहन मालक, चालक व वित्तदात्यांना अंतिम सूचना देण्यात येत असून संबंधितांनी १० दिवसांच्या आत वाहने ताब्यात न घेतल्यास, सक्षम प्राधिकाऱ्यांच्या परवानगीने ती बेवारस वाहने समजून त्यांचा जाहीर लिलाव करण्यात येईल.
वाहन कर व इतर थकबाकी वसुलीच्या कारवाईदरम्यान जप्त करण्यात आलेली तसेच अनेक महिन्यांपासून कार्यालयाच्या आवारात उभी असलेली सुमारे १५० वाहने अद्याप संबंधितांनी ताब्यात घेतलेली नाहीत. या वाहनांबाबत वाहन मालक, चालक किंवा वित्तदात्यांनी तातडीने कार्यालयाशी संपर्क साधून आवश्यक कर व शुल्क भरून वाहने ताब्यात घ्यावीत.
दीर्घकाळ एकाच ठिकाणी उभी राहिल्यामुळे वाहनांचे नुकसान होण्याची, त्यांची किंमत कमी होण्याची तसेच इंधन गळतीसारख्या कारणांमुळे अपघाताचा धोका निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे लिलाव करण्यात येणार असून
लिलावातून मिळणारी रक्कम शासन जमा करण्यात येणार आहे.
वाहनांच्या जाहीर लिलावाबाबतची तारीख, वेळ व ठिकाणाची माहिती cauction.gov.in तसेच www.mstcecommerce.com या संकेतस्थळांवर आणि उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, बारामतीच्या नोटीस बोर्डावर प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी सुरेंद्र निकम यांनी कळविले आहे.






