क्राईम रिपोर्ट

कोरेगाव आठवडा बाजारात पुन्हा एकदा दोन सराईतांना अटक..

शिक्रापूर पोलिसांची पाठपुरावा ठेवून कारवाई.

कोरेगाव आठवडा बाजारात पुन्हा एकदा दोन सराईतांना अटक..

शिक्रापूर पोलिसांची पाठपुरावा ठेवून कारवाई.

_अनेक गुन्ह्यांची नोंद असलेले दोघे सराईत चोरटे जेरबंद; शिक्रापूर पोलिसांची कारवाई_

शिक्रापूर; प्रतिनिधि

कोरेगाव भीमा येथील आठवडा बाजारात गर्दीचा फायदा घेऊन चोरी करण्याच्या तयारीत असलेल्या दोन सराईत चोरट्यांना शिक्रापूर पोलिसांनी रंगेहात पकडत त्यांचा डाव उधळून लावला. बाजार परिसरात सुरू असलेल्या पायी पेट्रोलिंगमुळे ही कारवाई यशस्वी झाली असून आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ६२ व ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

९ जुलै २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ५ वाजण्याच्या सुमारास कोरेगाव भीमा (ता.शिरूर, जि.पुणे) येथील आठवडा बाजारात पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या सूचनेवरून पोलीस हवालदार श्रवण गुपचे, नवनाथ नाईकडे आणि गणेश कुदळे हे पायी पेट्रोलिंग करत होते. यावेळी दोन संशयित इसम बाजारातील नागरिकांच्या गर्दीत चोरी करण्याचा प्रयत्न करताना पोलिसांच्या निदर्शनास आले. तत्काळ त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी आपली नावे जावेद अजिज सय्यद व लुकमान सुलेमान सय्यद, (दोघेही रा. मदिरा मोहल्ला, शिरूर, ता. शिरूर, जि. पुणे) अशी सांगितली. पोलिसांनी अधिक चौकशी केली असता आरोपींनी चोरीचा प्रयत्न केल्याची कबुली दिली. त्यानंतर शिक्रापूर पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार अजित इंगवले करत आहेत.
प्राथमिक तपासात या दोन्ही आरोपींवर यापूर्वीही रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाणे तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील कोतवाली पोलीस ठाण्यात चोरीसह विविध गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे हे दोघे सराईत गुन्हेगार असल्याचे समोर आले आहे.
ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक डॉ.शुभम कुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी रविंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्रापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवाजी भोसले पोलीस हवालदार श्रवण गुपचे, नवनाथ नाईकडे, गणेश कुदळे आणि पोलीस हवालदार इंगवले यांच्या पथकाने केली.

चौकट:;आठवडा बाजारांवर पोलिसांची करडी नजर!

‘गेल्या महिनाभरापासून शिक्रापूर, तळेगाव आणि कोरेगाव भीमा येथील आठवडा बाजारांमध्ये नियमित पायी पेट्रोलिंग सुरू आहे. यापूर्वी शिक्रापूर बाजारात चोरीचा प्रयत्न करणाऱ्या दोन महिलांना पकडून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता कोरेगाव भीमा बाजारात आणखी दोन चोरट्यांना रंगेहात पकडण्यात आले आहे. नागरिकांनीही संशयास्पद हालचाली दिसल्यास तातडीने पोलिसांना माहिती द्यावी.’
~चंद्रशेखर यादव, पोलीस निरीक्षक

Back to top button