इंदापूर शहरातील ८९७ लाभार्थ्यांना प्रधानमंत्री आवास योजनेतून घरकुल मंजूर
सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती

इंदापूर शहरातील ८९७ लाभार्थ्यांना प्रधानमंत्री आवास योजनेतून घरकुल मंजूर
सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती
इंदापूर : प्रतिनिधी
प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ( स्वतःच्या जागेवर बांधकाम) ३०९ तसेच प्रधानमंत्री आवास योजना (भागीदारी तत्त्वावर घरे) घटकाअंतर्गत ५८८ अशी एकूण ८९७ लाभार्थ्यांना घरकुल मंजूर झाली आहेत.अशी माहिती सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी बुधवारी (दि.१३) दिली.
इंदापूर शहरात ५ वर्ष किंवा त्याहून अधिक काळ वास्तव्यास असणारे भाडेकरू तसेच वादग्रस्त जागा असल्यामुळे बांधकाम परवानगी मिळण्यात अडचण असणारे किंवा लाभार्थ्यांची स्वतःची पसंती असणारे असे सर्व लाभार्थी या योजनेअंतर्गत सामावले आहेत.अशी माहिती मंत्री भरणे यांनी दिली.
सदरील योजनेअंतर्गत ५८८ घरांचा हा भव्य प्रकल्प इंदापूर नगरपरिषद हद्दीत नियोजित असून याचे अत्याधुनिक तंत्रज्ञानाने बांधकाम केले जाणार आहे.या सदनिकांमध्ये उच्च पद्धतीच्या सोयी-सुविधा उपलब्ध असणार आहेत. तसेच ह्या प्रकल्पात विविध क्षेत्रफळांची एकूण ४८ दुकाने आहेत.त्यामुळे शहरातील लघू व्यावसायिकांना व नागरिकांना पूरक अशी व्यावसायिक संधी या माध्यमातून निर्माण होणार आहे.
सदरील दोन्ही प्रकल्प २१ मार्च २०२२ रोजी गृह निर्माण विभाग, मंत्रालय येथे राज्यस्तरीय सनियंत्रण समितीच्या बैठकीत मंजूर होऊन,३० मार्च २०२२ रोजी केंद्रीय गृह निर्माण मंत्रालय दिल्ली येथे झालेल्या केंद्रीय मंजुरी व सनियंत्रण समितीच्या ६०व्या बैठकीत मंजूर झाले असल्याची माहिती दत्तात्रय भरणे यांनी दिली.
या मंजूर झालेल्या दोन्ही प्रकल्पाअन्वये प्रति लाभार्थ्यास राज्य शासनाकडून १ लाख रुपये तर केंद्र शासनाकडून १ लाख ५० हजार रुपये असे एकूण २ लाख ५० हजार रुपये प्रमाणे एकूण २२ कोटी ४२ लाख ५० हजारांचा लाभ मिळणार आहे.