“शहराची सेवा करणाऱ्या हातांना सुरक्षेचे कवच! बारामती नगरपरिषदेच्या २५३ कर्मचाऱ्यांना स्वेटर अन् सुरक्षा साहित्याची भेट!”
नगराध्यक्ष सचिन सातव, उपनगराध्यक्ष श्वेता नाळे यांच्या हस्ते साहित्य वितरण; महिला ५५ तर पुरुष १९८ कर्मचाऱ्यांचा समावेश!

“शहराची सेवा करणाऱ्या हातांना सुरक्षेचे कवच! बारामती नगरपरिषदेच्या २५३ कर्मचाऱ्यांना स्वेटर अन् सुरक्षा साहित्याची भेट!”
नगराध्यक्ष सचिन सातव, उपनगराध्यक्ष श्वेता नाळे यांच्या हस्ते साहित्य वितरण; महिला ५५ तर पुरुष १९८ कर्मचाऱ्यांचा समावेश!
बारामती वार्तापत्र
बारामती नगरपरिषदेच्या वतीने कायम आस्थापनेवरील वर्ग-४ महिला व पुरुष कर्मचाऱ्यांसाठी गुरुवार (दि. २६ नोव्हेंबर २०२६) रोजी विशेष उपक्रम राबविण्यात आला. नगरपरिषद कार्यालयात आयोजित कार्यक्रमात कर्मचाऱ्यांना स्वेटर व रेडियम जॅकेटचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाला नगराध्यक्ष सचिन सातव, उपनगराध्यक्ष श्वेता नाळे, सर्व नगरसेवक व नगरसेविका तसेच श्री. पंकज भुसे यांच्या शुभहस्ते साहित्य वितरण करण्यात आले.
२५३ कर्मचाऱ्यांना सुरक्षा साहित्याचा लाभ!
बारामती नगरपरिषदेत कायम आस्थापनेवरील वर्ग-४ कर्मचाऱ्यांची एकूण संख्या २५३ असून, यामध्ये ५५ महिला आणि १९८ पुरुष कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. उद्यान विभाग, आरोग्य विभाग, अतिक्रमण विभाग आणि अग्निशमन विभागात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना हे साहित्य वितरित करण्यात आले.
थंडीपासून संरक्षणासाठी स्वेटर; सुरक्षिततेसाठी रेडियम जॅकेट!
हिवाळ्याच्या दिवसांत कर्मचाऱ्यांना थंडीपासून संरक्षण मिळावे तसेच प्रतिकूल हवामानात काम करताना सुरक्षितता राखता यावी, या उद्देशाने दरवर्षी स्वेटरचे वाटप केले जाते. यापूर्वी दोन महिन्यांपूर्वी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांना रेनकोट व गमबूटचे वाटप करण्यात आले होते.
कर्मचाऱ्यांचे आरोग्य, सुरक्षितता आणि कामाच्या ठिकाणी आवश्यक सुविधा यांना प्राधान्य देत हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
संविधान दिनानिमित्त शुभेच्छा; २६/११ च्या शहीदांना श्रद्धांजली!
यावेळी स्वच्छता, वैद्यक व सार्वजनिक आरोग्य समितीचे सभापती श्री. नवनाथ सदाशिव बल्लाळ यांनी संविधान दिनानिमित्त उपस्थितांना शुभेच्छा दिल्या. तसेच २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या वीर जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
यावेळी नगराध्यक्ष सचिन सातव व उपनगराध्यक्ष श्वेता नाळे यांनी उपस्थित कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला नगरपरिषदेचे अधिकारी, कर्मचारी आणि संबंधित विभागांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
शहराच्या स्वच्छतेपासून आरोग्यापर्यंत आणि सुरक्षिततेपर्यंत महत्त्वाची जबाबदारी पार पाडणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रतिकूल हवामानातही कर्तव्य बजावण्यासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध करून देण्याचा नगरपरिषदेचा हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरला.






