स्थानिक

बारामती पॉवर मॅरेथॉनचा रनिंग ट्रॅक सज्ज; शहरातील वाहतुकीत मोठे बदल! शनिवारी रात्रीपासून रविवारी दुपारपर्यंत निर्बंध!

रेल्वे स्टेशन ते कटफळ स्टेशनदरम्यान मॅरेथॉनचा मार्ग; प्रमुख रस्त्यांवरील वाहतूक तात्पुरती बंद, वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन!

बारामती पॉवर मॅरेथॉनचा रनिंग ट्रॅक सज्ज; शहरातील वाहतुकीत मोठे बदल! शनिवारी रात्रीपासून रविवारी दुपारपर्यंत निर्बंध!

वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

बारामती वार्तापत्र 

बारामती स्पोर्ट्स फाउंडेशनच्या वतीने रविवार, दि. २९ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या ‘बारामती पॉवर मॅरेथॉन २०२६’ च्या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल करण्यात आले आहेत. मॅरेथॉनदरम्यान वाहतूक कोंडी होऊ नये आणि स्पर्धा सुरळीत पार पडावी, यासाठी प्रशासनाने विशेष नियोजन केले आहे.

शनिवारी रात्री ११ पासून वाहतूक निर्बंध!

प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, शनिवार, दि. २८ नोव्हेंबर रोजी रात्री ११ वाजल्यापासून रविवार, दि. २९ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजेपर्यंत किंवा मॅरेथॉन संपेपर्यंत आवश्यकतेनुसार संबंधित मार्गांवरील वाहतूक तात्पुरती बंद ठेवण्यात येणार आहे.

या कालावधीत वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा. नागरिकांनी वाहतूक बदलांची नोंद घेऊन प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

रेल्वे स्टेशन ते कटफळ स्टेशन असा मॅरेथॉनचा मार्ग!

या मॅरेथॉनला भिगवण रोडवरील रेल्वे स्टेशन ग्राउंड येथून सुरुवात होणार आहे. त्यानंतर स्पर्धक पेन्सिल चौक, विमानतळ मार्ग, भारत फोर्स आणि फरेरो कंपनीमार्गे कटफळ स्टेशनपर्यंत धावणार आहेत.

कटफळ स्टेशन येथे यू-टर्न घेऊन याच मार्गाने पुन्हा रेल्वे स्टेशन ग्राउंड येथे परतल्यानंतर मॅरेथॉनची सांगता होणार आहे.

जिल्हाधिकाऱ्यांचे वाहतूक बदलाबाबत आदेश

जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डुडी यांनी मोटार वाहन कायदा १९८८ मधील कलम ११५ तसेच गृह विभागाच्या अधिसूचनेनुसार प्राप्त अधिकारांचा वापर करून वाहतूक बदलासंदर्भातील आदेश जारी केले आहेत.

वाहनचालकांनी प्रशासनाला सहकार्य करावे!

मॅरेथॉनच्या आयोजनामुळे शहरातील प्रमुख मार्गांवर वाहतुकीचा ताण वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी प्रवासाचे नियोजन आधीच करावे, निर्धारित वेळेत पर्यायी मार्गांचा वापर करावा आणि वाहतूक पोलिसांच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

एकीकडे बारामतीत धावपटूंचा उत्साह, तर दुसरीकडे वाहतूक व्यवस्थेचे मोठे आव्हान! त्यामुळे रविवारी घराबाहेर पडण्यापूर्वी वाहतूक बदलांची माहिती नक्की घ्या!

Back to top button