स्थानिक

देहदानातून वैद्यकीय शिक्षणाला बळ; बारामतीत देहदात्यांच्या कुटुंबीयांचा गौरव

देहदान ही वैद्यकीय शिक्षणाला दिलेली अमूल्य देणगी आहे.

देहदानातून वैद्यकीय शिक्षणाला बळ; बारामतीत देहदात्यांच्या कुटुंबीयांचा गौरव

देहदान ही वैद्यकीय शिक्षणाला दिलेली अमूल्य देणगी आहे.

बारामती वार्तापत्र 

देहदानाला वैद्यकीय शिक्षणामध्ये अनन्यसाधारण महत्त्व असून देहदात्यांच्या योगदानामुळे भावी डॉक्टरांना मानवी शरीररचनेचा प्रत्यक्ष आणि सखोल अभ्यास करता येतो. त्यामुळे देहदान ही वैद्यकीय शिक्षणाला दिलेली अमूल्य देणगी आहे, असे प्रतिपादन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. अंजली पाटील यांनी केले.

बारामती येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात देहदान करणाऱ्या कुटुंबीयांच्या सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार उपस्थित होते.

यावेळी गणेश बिरादार यांनी देहदान आणि अवयवदानाचे सामाजिक महत्त्व विशद केले. समाजामध्ये देहदान व अवयवदानाबाबत व्यापक जनजागृती होणे आवश्यक असून अधिकाधिक नागरिकांनी या महान मानवतावादी कार्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

डॉ. गीतांजली सुडके यांनी देहदानातून वैद्यकीय शिक्षण व संशोधनाला मिळणारे योगदान तसेच आजच्या काळातील देहदानाची गरज याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. डॉ. सुरज जाधवर यांनी अवयवदानामुळे गरजू रुग्णांना मिळणाऱ्या जीवनदानाचे महत्त्व अधोरेखित केले.

कार्यक्रमात देहदान करणाऱ्या दात्यांच्या नातेवाईकांचा स्मृतीचिन्ह देऊन विशेष सन्मान करण्यात आला. देहदानाचा महान निर्णय घेतलेल्या दात्यांच्या कुटुंबीयांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

यावेळी देहदान आणि अवयवदानाबाबत समाजात असलेल्या विविध गैरसमज व शंकांचे निरसन करण्यात आले. वैज्ञानिक दृष्टिकोनातून देहदानाचे महत्त्व समजावून सांगत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली.

कार्यक्रमाला उपअधिष्ठाता डॉ. सचिन दगडे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेश उमाप, प्राध्यापक व विभागप्रमुख डॉ. विवेक सहस्त्रबुध्ये, डॉ. लीना नकाते, डॉ. राजेश हिरे, डॉ. विनय टापरे, डॉ. किरण जाधव, डॉ. सुजाता धर्मशाळे यांच्यासह वैद्यकीय विद्यार्थी, देहदात्यांचे नातेवाईक, पत्रकार, कर्मचारी आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या शेवटी किरण घुगे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Back to top button