निरेचा रौद्रावतार! होळचा पूल पाण्याखाली; फलटण-बारामती मार्ग बंद
वीर धरणातून ६३ हजारांहून अधिक क्युसेक विसर्ग...

निरेचा रौद्रावतार!
होळचा पूल पाण्याखाली; फलटण-बारामती मार्ग बंद
वीर धरणातून ६३ हजारांहून अधिक क्युसेक विसर्ग…
बारामती वार्तापत्र
सततच्या मुसळधार पावसामुळे आणि वीर धरणातून वाढविण्यात आलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे निरा नदीने रौद्ररूप धारण केले आहे. फलटण तालुक्यातील होळ येथील फलटण-बारामती मार्गावरील पूल शुक्रवारी सायंकाळी पूर्णपणे पाण्याखाली गेल्याने या मार्गावरील वाहतूक तात्काळ बंद करण्यात आली आहे.
पुलावरून वेगाने पाणी वाहत असल्याने नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.
निरा नदी दुथडी भरून वाहत असल्याने पुलावरून मोठ्या वेगाने पाणी वाहत आहे. पूरस्थिती पाहण्यासाठी परिसरात नागरिकांची गर्दी होत असली तरी नदीपात्र किंवा पुलाजवळ जाणे जीवावर बेतू शकते, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.
दरम्यान, वीर धरणातून दुपारी ४ वाजल्यापासून सांडव्यावरून ६२,९२४ क्युसेक आणि अतिवाहकाद्वारे १,४०० क्युसेक असा एकूण ६३,३२३ क्युसेक पाण्याचा विसर्ग निरा नदीपात्रात सुरू करण्यात आला आहे. पावसाचा जोर आणि धरणात होणारी आवक लक्षात घेऊन या विसर्गात पुढील काळात वाढ किंवा घट होऊ शकते, असे धरण प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर निरा नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी सतर्क राहावे, नदीपात्रात उतरू नये, पाण्याखाली गेलेल्या पुलांवरून वाहन किंवा पायी जाण्याचा प्रयत्न करू नये आणि प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. प्रशासन परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून आहे.







