“पुण्याच्या फेऱ्या कमी होणार! बारामतीत अपर जिल्हाधिकारी कार्यालयाला मंजुरी; दौंड-इंदापूरसह ३ तालुक्यांचा कारभार”
दौंड-इंदापूरसह तीन तालुक्यांचा कारभार आता बारामतीतून!

“पुण्याच्या फेऱ्या कमी होणार! बारामतीत अपर जिल्हाधिकारी कार्यालयाला मंजुरी; दौंड-इंदापूरसह ३ तालुक्यांचा कारभार”
दौंड-इंदापूरसह तीन तालुक्यांचा कारभार आता बारामतीतून!
बारामती वार्तापत्र
राज्याच्या महसूल प्रशासनाला अधिक गतिमान आणि नागरिकांच्या जवळ नेण्यासाठी राज्य शासनाने चार नवीन अपर जिल्हाधिकारी कार्यालये आणि ४७ नवीन अपर तहसीलदार कार्यालयांना मंजुरी दिली आहे. महसूल विभागाने २३ सप्टेंबर २०२६ रोजी याबाबतची माहिती जाहीर केली.
या निर्णयाचा बारामती, दौंड आणि इंदापूर या तीन तालुक्यांना थेट फायदा होणार आहे. बारामती येथे अपर जिल्हाधिकारी कार्यालय कार्यान्वित करण्यास शासनाने मंजुरी दिली असून, या कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात या तीन तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे.
पुणे जिल्ह्याची नवी प्रशासकीय रचना
नवीन व्यवस्थेनुसार बारामती, दौंड आणि इंदापूर या तीन तालुक्यांशी संबंधित अपर जिल्हाधिकारी संवर्गातील कामकाज बारामती येथील कार्यालयातून हाताळले जाणार आहे. तर पुणे अपर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात पुणे शहरासह अन्य ११ तालुके राहणार आहेत.
यामुळे महसूल विभागाशी संबंधित अनेक जिल्हास्तरीय कामांसाठी बारामती, दौंड आणि इंदापूरच्या नागरिकांना पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वारंवार फेऱ्या मारण्याची गरज कमी होण्याची शक्यता आहे.
नवीन कार्यालय सुरुवातीला तात्पुरत्या जागेत सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. कार्यालयासाठी जागा, अधिकारी-कर्मचारी आणि आवश्यक सुविधांची पूर्तता करून १५ दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानंतर प्रत्यक्ष कामकाज सुरू करण्याबाबत शासनाकडून पुढील सूचना दिल्या जाणार आहेत.
राज्यभरही मोठा विस्तार
बारामतीसह पंढरपूर, दापोली आणि नागपूर (ग्रामीण) येथेही अपर जिल्हाधिकारी कार्यालये स्थापन करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर राज्यातील २१ जिल्ह्यांत ४७ अपर तहसीलदार कार्यालये सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महसूल सेवांचे विकेंद्रीकरण करून नागरिकांना स्थानिक पातळीवर अधिक सुलभ सेवा मिळवून देणे हा या निर्णयामागील उद्देश आहे.






