राजकीय

बारामतीतील अजितदादांच्या स्मृतिस्थळी अनिकेत तटकरे यांचे अभिवादन; “माझा विजय दादांना समर्पित”

कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण

बारामतीतील अजितदादांच्या स्मृतिस्थळी अनिकेत तटकरे यांचे अभिवादन; “माझा विजय दादांना समर्पित”

कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण

बारामती वार्तापत्र

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे रायगड विधान परिषद मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार अनिकेत तटकरे यांनी बिनविरोध निवडून आल्यानंतर बारामती येथे येऊन दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्मृतिस्थळी अभिवादन केले.

यावेळी त्यांनी आपल्या विजयाचे श्रेय अजितदादांच्या मार्गदर्शनाला देत हा विजय त्यांना समर्पित असल्याची भावना व्यक्त केली.

अनिकेत तटकरे यांनी स्मृतिस्थळी पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली. यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले की, “विधान परिषदेवर दुसऱ्यांदा निवडून येण्याची संधी मिळाली, ही माझ्यासाठी मोठी जबाबदारी आहे. अजितदादांनी नेहमीच कार्यकर्त्यांना बळ देण्याचे आणि विकासाभिमुख राजकारण करण्याचे धडे दिले.

त्यांच्या विचारांमुळेच आम्हाला काम करण्याची प्रेरणा मिळाली. त्यामुळे हा विजय मी त्यांना समर्पित करीत आहे.”
बारामती आणि रायगड या दोन्ही भागांतील कार्यकर्त्यांशी अजितदादांचे असलेले जिव्हाळ्याचे नाते अधोरेखित करताना तटकरे यांनी त्यांच्या कार्याची आठवणही यावेळी जागवली.

अजितदादांच्या नेतृत्वाखाली पक्ष संघटना मजबूत झाली असून त्यांचे विचार पुढे नेण्यासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, तटकरे यांच्या बारामती दौऱ्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. स्मृतिस्थळी पक्ष पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून अजितदादांना अभिवादन केले. विधान परिषदेवरील पुनर्निवडीनंतरचा हा भावनिक दौरा राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे.

Back to top button