बारामतीत अवैध धंद्यांविरोधात पोलिसांचा ‘ॲक्शन मोड’; दोन मटका अड्डे उद्ध्वस्त
शाळा-महाविद्यालय परिसरात तंबाखू विक्री?

बारामतीत अवैध धंद्यांविरोधात पोलिसांचा ‘ॲक्शन मोड’; दोन मटका अड्डे उद्ध्वस्त
शाळा-महाविद्यालय परिसरात तंबाखू विक्री?
बारामती वार्तापत्र
बारामती शहरातील अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी बारामती शहर पोलिसांनी 31 ऑगस्ट रोजी एकाच दिवशी तीन स्वतंत्र ठिकाणी कारवाई केली. पानगली आणि सटवाजीनगर परिसरातील दोन कल्याण मटका अड्ड्यांवर छापे टाकून दोघांना ताब्यात घेण्यात आले. तसेच शैक्षणिक संस्थेच्या 100 मीटर परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री केल्याप्रकरणी एका व्यावसायिकाविरुद्ध कारवाई करण्यात आली.
ही कारवाई अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम यांच्या मार्गदर्शनाखाली आणि बारामती शहर पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.
🎯 पानगलीत मटका अड्ड्यावर छापा
पानगली परिसरात कल्याण मटका सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी पंचांसमक्ष छापा टाकला. या कारवाईत अभिजीत किशोर शिंदे (वय 27) याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून 560 रुपये रोख, मटका जुगाराच्या स्लीप बुक, आकड्यांच्या चिठ्ठ्या आणि लेखन साहित्य जप्त करण्यात आले.
याप्रकरणी बारामती शहर पोलीस ठाण्यात गु.र.नं. 354/2026, महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम कलम 12(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
🚔 सटवाजीनगरमध्येही कारवाई.
यानंतर सटवाजीनगर येथील न्यू टी हाऊस परिसरात सुरू असलेल्या कथित कल्याण मटका जुगारावर पोलिसांनी कारवाई केली. चंदन अशोक खुलसे (वय 25) याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून 610 रुपये रोख, दोन स्लीप बुक, जुगाराच्या आकड्यांच्या नोंदी असलेल्या चिठ्ठ्या आणि लेखन साहित्य जप्त करण्यात आले.
याप्रकरणी गु.र.नं. 355/2026, महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम कलम 12(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
🚭 शैक्षणिक संस्थेच्या परिसरात तंबाखू विक्रीवर कारवाई
माळेगाव कॉलनी, शारदानगर येथील आर.जी. ट्रेडर्स येथे शारदाबाई पवार महाविद्यालयाच्या 100 मीटर परिसरात तंबाखूजन्य पदार्थ विक्रीसाठी ठेवल्याचे आढळल्याने रविंद्र मोहनलाल गायकवाड (वय 38) यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली.
या प्रकरणी सिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादने नियंत्रण कायद्यानुसार कलम 6(ब) व शिक्षा कलम 24 अन्वये खटला दाखल करण्यात आला आहे.
📢 “अवैध धंदा दिसला तर दुर्लक्ष करू नका”
बारामती शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मटका, सट्टा, जुगार, अवैध दारू, गांजा व इतर अंमली पदार्थ, ऑनलाइन जुगार तसेच प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांची बेकायदेशीर विक्री याविरोधात कारवाई सुरूच राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.
नागरिकांनी अवैध धंद्यांची माहिती डायल 112 किंवा बारामती शहर पोलीस ठाण्याला द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. माहिती देताना नागरिकांनी स्वतः संबंधित व्यक्तींशी वाद घालू नये किंवा कारवाई करण्याचा प्रयत्न करू नये, असेही पोलिसांनी सांगितले.






