बारामतीत बनावट पी.ओ.पी. सिलिंग पट्ट्यांवर पोलिसांचा छापा; 82 हजारांचा संशयित माल जप्त
12 फूट लांबीच्या व 2 इंच रुंदीच्या सिलिंग पट्ट्यांचे 59 बंडल, म्हणजेच एकूण 1180 नग जप्त

बारामतीत बनावट पी.ओ.पी. सिलिंग पट्ट्यांवर पोलिसांचा छापा; 82 हजारांचा संशयित माल जप्त
12 फूट लांबीच्या व 2 इंच रुंदीच्या सिलिंग पट्ट्यांचे 59 बंडल, म्हणजेच एकूण 1180 नग जप्त
बारामती वार्तापत्र
नामांकित कंपनीच्या उत्पादनाच्या डिझाइनची नक्कल करून तयार करण्यात आलेल्या संशयित बनावट पी.ओ.पी. सिलिंग पट्ट्यांचा साठा बारामती शहर पोलिसांनी जप्त केला आहे. या कारवाईत तब्बल 82 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून दुकान मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बारामती शहर पोलीस स्टेशनला मिळालेल्या माहितीनुसार, सेंट गोबाईं इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या उत्पादनाच्या डिझाइनची नक्कल करून पी.ओ.पी. सिलिंग पट्ट्यांची निर्मिती व विक्री होत असल्याची तक्रार स्पीड सर्च अँड सिक्युरिटी नेटवर्क प्रा. लि., चंदीगडचे फिल्ड एक्झिक्युटीव्ह सरफराज अब्दुल रऊफ तांबोळी यांनी दिली होती.
या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी देशमुख वस्ती, पाटस रोड येथील समीर एंटरप्राईजेस या दुकानावर छापा टाकला. पंचांच्या उपस्थितीत करण्यात आलेल्या पाहणीत कंपनीच्या मूळ उत्पादनाशी साधर्म्य असलेल्या पी.ओ.पी. सिलिंग पट्ट्यांचा मोठा साठा आढळून आला.
कारवाईदरम्यान 12 फूट लांबीच्या व 2 इंच रुंदीच्या सिलिंग पट्ट्यांचे 59 बंडल, म्हणजेच एकूण 1180 नग जप्त करण्यात आले. या मालाची अंदाजे किंमत 82 हजार 600 रुपये इतकी असल्याचे पोलिसांनी सांगितले. पंचासमक्ष नमुने वेगळे काढून उर्वरित माल जप्त करून सीलबंद करण्यात आला.
या प्रकरणी समीर एंटरप्राईजेसचे मालक शरफुद्दीन सैपूल्लाह कुरेशी (वय 38, रा. रेणुका नगर, फलटण रोड, बारामती) यांच्याविरुद्ध बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा प्रतीलिपी अधिकार अधिनियम 1957 मधील कलम 51, 63 आणि 65 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, जप्त मालाचा उगम, त्याची उत्पादन व पुरवठा साखळी, आर्थिक व्यवहार, संबंधित ग्राहक तसेच उत्पादनासाठी वापरण्यात आलेली यंत्रसामग्री याबाबत पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे. यासोबतच संबंधित कंपनीकडून तांत्रिक व कायदेशीर अभिप्राय मागविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
बौद्धिक संपदा हक्कांचे उल्लंघन करून बनावट उत्पादनांची निर्मिती व विक्री करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे. तसेच अशा प्रकारच्या संशयास्पद उत्पादनांबाबत माहिती असल्यास नागरिकांनी पुढे येऊन पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक श्री. संदीपसिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक श्री. गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड आणि प्रभारी पोलीस निरीक्षक श्री. श्रीशैल चिवडशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पोलीस उपनिरीक्षक रत्नदीप भंडारे, संजय जाधव, पोलीस शिपाई अक्षय सिताफ आणि वाहनचालक पोलीस शिपाई ऋषिकेश जाधव यांनी या कारवाईत सहभाग घेतला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रत्नदीप भंडारे करीत आहेत.






