बारामतीत सुनेत्रा पवारांचा ऐतिहासिक विजय,दोन्ही NCP विलीनीकरणाच्या तयारीत?जय पवारांनी थेट सांगून टाकलं.राजकारणात खळबळ!
काँग्रेसकडून उमेदवार देण्यात आला होता

बारामतीत सुनेत्रा पवारांचा ऐतिहासिक विजय,दोन्ही NCP विलीनीकरणाच्या तयारीत?जय पवारांनी थेट सांगून टाकलं.राजकारणात खळबळ!
काँग्रेसकडून उमेदवार देण्यात आला होता
बारामती वार्तापर
बारामती पोटनिवडणुकीत उपमुख्यमंत्री आणि अजित पवार गटाच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी मोठा विजय संपादन केला आहे. त्यांनी २ लाख १८ हजार ९३० मतांसह ऐतिहासिक विजय मिळवला आहे.
हे देशातील सर्वात मोठं पहिल्या क्रमांकाचं लीड आहे. बारामतीत सुरुवातीपासून सुनेत्रा पवारच जिंकतील, असा अंदाज होता. हा अंदाज खरा ठरवत सुनेत्रा पवारांनी विरोधी उमेदवारांना धूळ चारली आहे.
खरं तर, बारामती पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेससह महायुतीकडून प्रयत्न केले जात होते. बारामती हा फुटीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला होता, असं असूनही इथं शरद पवार गटांनी उमेदवार दिला नाही. पवारांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला.
मात्र इथं काँग्रेसकडून उमेदवार देण्यात आला होता. मात्र त्यांनी अर्ज मागे घेण्यासाठी अवघे काही मिनिटं उरली असताना त्यांनी अर्ज मागे घेतला. शिवाय शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारही स्वत: प्रचारात उतरले होते. आता अखेर बारामतीचं चित्र स्पष्ट झालं असून सुनेत्रा पवारांनी एकहाती विजय मिळवला आहे.
बारामतीतील मताधिक्याचा विक्रम दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावावर होता. त्यांनी २०१९ मध्ये एक लाख ६५ हजार २६५ मताधिक्याने विजय मिळवला होता. अजित पवार यांनी भाजपचे तत्कालीन उमेदवार गोपीचंद पडळकर यांचा पराभव केला होता.
हा महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या इतिहासातला सर्वात मोठा विजय होता. मात्र सुनेत्रा पवारांनी हा विक्रम मोडून काढला आहे. बारामतीकरांनी भरभरून त्यांना प्रेम दिलं आहे. १९ व्या फेरीअखेर सुनेत्रा पवारांनी हा रेकॉर्ड आपल्या नावावर केला.
अजित पवार हे सलग आठवेळा बारामतीतून निवडून आले. त्यांपैकी तीन निवडणुकांमध्ये त्यांनी एक लाखांहून अधिक मतांनी विजय साकारला. २००९ मध्ये त्यांनी अपक्ष उमेदवार रंजन तावरे यांच्यावर एक लाख दोन हजार ७९७ मताधिक्याने विजयी मिळविला.
२०१९च मध्ये पडळकर यांचा विक्रमी मताधिक्याने पराभव केल्यावर २०२४ च्या निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे युवा नेते युगेंद्र पवार यांचा एक लाख ८९९ मतांनी पराभव केला.
दरम्यान, आता या विजयानंतर सुनेत्रा पवार यांचे पुत्र जय पवार यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद सादला आहे. यावेळी बोलताना त्यांनी राष्ट्रवादी पक्षाच्या आगामी वाटचालीवर महत्त्वाचं भाष्य केलं आहे. सोबतच त्यांनी राष्ट्रवादी पक्षाच्या विलिनीकरणावरही भाष्य केलं. त्यांच्या या विधानाने आता राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.
काही दिवसांपूर्वी खासदार सुनेत्रा पवार यांनीही विलिनीकरणाची चर्चा सध्या थांबलेली आहे, असे विधान केले होते. जय पवार नेमकं काय म्हणाले? दिवंगत नेते अजित पवार यांच्यासाठी सर्वांनीच ही निवडणूक स्वत:च्या हातात घेतली. अजितदादा आणि सुनेत्रा वहिनी यांना सर्वांनीच आधार दिला आहे, असे मत जय पवार यांनी व्यक्त केले. यावेळी पत्रकारांनी त्यांना खासदार सुप्रिया सुळे यांच्या विधानाचा आधार घेत विलिनीकरणावरही विचारलं. निवडणुकीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने सुनेत्रा पवार यांना पाठिंबा दिला.
आगामी काळात दोन्ही राष्ट्रवादींची वाटचाल कशी असेल? असंही त्यांना विचारण्यात आलं. यावर बोलताना, दोन्ही राष्ट्रवादीच्या वाटचालीबद्दल किंवा विलिनीकरणाबद्दल मी एकटा ठरवू शकत नाही.
विलिनीकर दोन्ही पक्षांचे होणे गरजेचे आहे. त्यामुळे दोन्ही पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी विलिनीकरणाबाबत काही ठरवलं किंवा तशी चर्चा केली, तर त्यावेळी चित्र वेगळे असू शकते, असे सूचक विधान जय पवार यांनी केले.






