सोमेश्वर

बारामतीत सोमेश्वर निवडणुकीचा सामना रंगणार; युगेंद्र पवारांकडून शेतकरी पॅनलची घोषणा

‘तरुणांना संधी, संचालक मंडळात बदल गरजेचा!’

बारामतीत सोमेश्वर निवडणुकीचा सामना रंगणार; युगेंद्र पवारांकडून शेतकरी पॅनलची घोषणा

‘तरुणांना संधी, संचालक मंडळात बदल गरजेचा!’

बारामती वार्तापत्र 

बारामती तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक जाहीर झाल्याने तालुक्यातील सहकार क्षेत्रातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार गटाच्या माध्यमातून ‘शेतकरी पॅनल’ उभे करून निवडणूक ताकदीने लढविण्याची घोषणा युवा नेते युगेंद्र पवार यांनी पत्रकार परिषदेत केली.

सोमेश्वर कारखाना यापूर्वी दिवंगत नेते अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत होता. सध्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याचे कामकाज सुरू असल्याचा उल्लेख युगेंद्र पवार यांनी केला. त्यामुळे सोमेश्वर कारखाना निवडणुकीच्या निमित्ताने बारामतीच्या सहकार क्षेत्रातील राजकीय समीकरणांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

युगेंद्र पवार म्हणाले की, पवार साहेबांच्या मार्गदर्शनामुळे आणि अजितदादांच्या कष्टामुळे सोमेश्वर कारखाना चांगल्या पद्धतीने चालला. अजितदादांचा कारखान्यावर प्रभावी वचक होता. गैरप्रकार आढळल्यास तातडीने कारवाई आणि चौकशी केली जात होती, असे त्यांनी नमूद केले.

अजितदादा आज हयात नसले तरी पवार साहेबांनी कारखान्याकडे लक्ष द्यावे, अशी सभासदांची इच्छा असल्याचे सांगत, पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सोमेश्वर कारखान्याची निवडणूक पक्षाच्या माध्यमातून लढविण्याचा निर्णय घेतल्याचे युगेंद्र पवार यांनी स्पष्ट केले.

‘तरुण आणि नव्या नेतृत्वाला संधी’

शेतकरी पॅनलमध्ये उच्चशिक्षित, तरुण, ज्येष्ठ आणि अनुभवी उमेदवारांचा समावेश करण्याचा प्रयत्न असल्याचे युगेंद्र पवार यांनी सांगितले. स्वच्छ प्रतिमेचे आणि सभासदांच्या प्रश्नांसाठी काम करणारे उमेदवार देण्याचा दावा त्यांनी केला.

मागील १० ते १५ वर्षांपासून, तर काही ठिकाणी सुमारे ३० वर्षांपासून तेच लोक संचालकपदावर असल्याचा आरोप करत तरुण सभासदांना आणि नव्या नेतृत्वाला संधी देणे गरजेचे असल्याचे त्यांनी म्हटले.

ऊस उत्पादक आणि कामगारांचे हित केंद्रस्थानी

ऊस उत्पादक शेतकरी, कारखान्याचे सभासद आणि कामगारांचे हित केंद्रस्थानी ठेवून काम करण्याचा निर्धार शेतकरी पॅनलने व्यक्त केला आहे. विद्यमान संचालक मंडळात बदल होणे गरजेचे असल्याचेही युगेंद्र पवार यांनी मत व्यक्त केले.

दरम्यान, माळेगाव सहकारी साखर कारखान्यातील डिस्टिलरीसंदर्भात निर्माण झालेल्या अडचणींचा संदर्भ देत, प्रशासक नेमण्याची वेळ येत असेल तर सभासदांनी निवडून दिलेल्या संचालकांची भूमिका काय, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. संचालक मंडळावर प्रभावी वचक आणि योग्य देखरेख असणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

पवार साहेबांना सहकार आणि साखर कारखानदारीचा मोठा अनुभव असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली सोमेश्वरसाठी सक्षम शेतकरी पॅनल उभे करण्याचा निर्णय घेतल्याचे युगेंद्र पवार यांनी स्पष्ट केले.

सोमेश्वर कारखाना निवडणुकीत शेतकरी पॅनलची घोषणा झाल्याने बारामती तालुक्यातील सहकार क्षेत्रातील राजकीय समीकरणांना नवे वळण मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आता या निवडणुकीत कोणते पॅनल कोणत्या उमेदवारांना संधी देते आणि सभासदांचा कौल कुणाच्या बाजूने जातो, याकडे बारामतीचे लक्ष लागले आहे.

Back to top button