बारामतीत ५ अटकावलेल्या वाहनांचा २३ ऑक्टोबरला ई-लिलाव; वाहनमालकांना शेवटची संधी!
थकीत कर, दंड न भरल्यास वाहनांचा भंगार स्वरूपात लिलाव; आरटीओ कार्यालयाची सूचना

बारामतीत ५ अटकावलेल्या वाहनांचा २३ ऑक्टोबरला ई-लिलाव; वाहनमालकांना शेवटची संधी!
थकीत कर, दंड न भरल्यास वाहनांचा भंगार स्वरूपात लिलाव; आरटीओ कार्यालयाची सूचना
बारामती वार्तापत्र
मोटार वाहन कर थकवणे तसेच मोटार वाहन कायदा आणि त्याअंतर्गत नियमांचे उल्लंघन केल्यामुळे बारामती उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाने अटकावून ठेवलेल्या पाच वाहनांचा येत्या २३ ऑक्टोबर २०२६ रोजी ई-लिलाव करण्यात येणार आहे. संबंधित वाहनमालकांनी विहित मुदतीत थकीत कर, दंड आणि इतर देय रक्कम भरून वाहनांचा ताबा घ्यावा, असे आवाहन कार्यालयाकडून करण्यात आले आहे.
मोटार वाहन कर न भरल्यामुळे तसेच कायद्यातील विविध तरतुदींचे उल्लंघन केल्यामुळे ही वाहने अटकावून ठेवण्यात आली आहेत. संबंधित वाहनांच्या मूळ मालकांना थकीत कर, दंड आणि इतर देय रक्कम भरण्याबाबत यापूर्वी तीन वेळा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. मात्र, अद्याप संबंधितांकडून थकबाकी भरून वाहनांचा ताबा घेण्यात आलेला नसल्याचे परिवहन कार्यालयाने स्पष्ट केले आहे.
वाहनमालकांना सात दिवसांची मुदत
संबंधित वाहनमालक आणि ताबेदारांनी कार्यालयीन प्रक्रियेची पूर्तता करून थकीत कर, दंड व इतर देय रक्कम भरावी आणि निर्धारित मुदतीत वाहनांचा ताबा घ्यावा. अन्यथा, कोणतीही पुढील सूचना न देता संबंधित वाहनांचा भंगार (Scrap) स्वरूपात जाहीर ई-लिलाव करण्यात येणार आहे.
या पाच वाहनांची यादी उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या सूचना फलकावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यामुळे संबंधित वाहनमालकांनी वेळेत कार्यवाही करून संभाव्य लिलाव टाळण्यासाठी आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण करावी.
ई-लिलाव कुठे होणार?
बारामती उप प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत हा ई-लिलाव www.mstcecommerce.com या संकेतस्थळावर आयोजित करण्यात येणार आहे. विहित मुदतीत वाहनांचा ताबा न घेतल्यास लिलावाची प्रक्रिया राबविण्यात येईल, याची संबंधित वाहनमालक व ताबेदारांनी नोंद घ्यावी, असे आवाहन परिवहन कार्यालयाने केले आहे.






