बारामती तालुक्यात विशेष सखोल मतदार पुनरीक्षण मोहिमेत मोठे यश; १०० टक्के डिजिटल मॅपिंग पूर्ण
स्थानिक नागरिकांचे सहकार्य आणि प्रशासनाच्या प्रभावी समन्वयामुळे ही मोहीम यशस्वीपणे पूर्ण

बारामती तालुक्यात विशेष सखोल मतदार पुनरीक्षण मोहिमेत मोठे यश; १०० टक्के डिजिटल मॅपिंग पूर्ण
स्थानिक नागरिकांचे सहकार्य आणि प्रशासनाच्या प्रभावी समन्वयामुळे ही मोहीम यशस्वीपणे पूर्ण
बारामती वार्तापत्र
विशेष सखोल मतदार पुनरीक्षण (Special Intensive Revision-SIR) मोहिमेअंतर्गत बारामती तालुक्यातील आठ मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांनी मतदार पडताळणी आणि डिजिटल मॅपिंगचे काम मुदतीपूर्वीच १०० टक्के पूर्ण करत उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. या उत्कृष्ट कार्याबद्दल संबंधित बीएलओंना तहसीलदार स्वप्निल रावडे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
या मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डूडी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर, प्रांताधिकारी उत्तम दिघे आणि तहसीलदार स्वप्निल रावडे यांनी सातत्याने आढावा घेत आवश्यक मार्गदर्शन केले. तांत्रिक सहाय्य, नियोजनबद्ध कार्यपद्धती आणि वेळोवेळी दिलेल्या सूचनांमुळे हे उद्दिष्ट मुदतीपूर्वी पूर्ण करणे शक्य झाले.
मोहिमेत रणजित दिलीप ननवरे (भाग क्र. ३), पोपट गुलाबराव कोकरे (भाग क्र. ३५), विलास महादेव देवकाते (भाग क्र. १०२), विशाल धुळे (भाग क्र. २४६), गणेश अरुण गायकवाड (भाग क्र. २५३), पुष्पा मधुकर वाबळे (भाग क्र. ३४९), सुनिल रघुनाथ घाडगे (भाग क्र. ३६६) आणि सोमनाथ नारायण वाघमोडे (भाग क्र. ३७२) यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील मतदारांची पडताळणी, माहिती संकलन, ऑनलाइन नोंदणी आणि डिजिटल मॅपिंगचे काम शंभर टक्के पूर्ण केले.
नियमित शासकीय जबाबदाऱ्यांसोबतच संबंधित बीएलओंनी दुर्गम भागांतील मतदारांच्या प्रत्यक्ष भेटी घेऊन माहिती संकलित केली. ऑनलाइन अर्जांची पूर्तता, माहितीची अचूक पडताळणी आणि वेळेत डिजिटल मॅपिंग करण्यासाठी त्यांनी नियोजनबद्ध पद्धतीने कार्य केले. स्थानिक नागरिकांचे सहकार्य आणि प्रशासनाच्या प्रभावी समन्वयामुळे ही मोहीम यशस्वीपणे पूर्ण झाली.
या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत तहसीलदार स्वप्निल रावडे यांच्या हस्ते संबंधित बीएलओंना प्रशस्तीपत्र प्रदान करून गौरविण्यात आले. राष्ट्रीय कर्तव्याप्रती दाखविलेली निष्ठा, समर्पित सेवा आणि उत्कृष्ट कार्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले.
या यशामुळे विशेष सखोल मतदार पुनरीक्षण मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीस अधिक बळ मिळाले असून इतर कर्मचाऱ्यांनाही प्रेरणा मिळेल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला.







