स्थानिक

बारामती विमानतळासाठी ७० कोटींचा प्रस्ताव; धावपट्टीपासून प्रकाशयोजना, सुरक्षा सुविधांचा होणार विकास

रात्रीची उड्डाणेही होणार सुरक्षित!

बारामती विमानतळासाठी ७० कोटींचा प्रस्ताव; धावपट्टीपासून प्रकाशयोजना, सुरक्षा सुविधांचा होणार विकास

रात्रीची उड्डाणेही होणार सुरक्षित!

बारामती वार्तापत्र

विमानतळाचे आधुनिकीकरण आणि सुरक्षाव्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने (MADC) महत्त्वाची पावले उचलली आहेत. विमानतळाच्या पहिल्या टप्प्यातील विविध विकासकामांसाठी सुमारे ७० कोटी रुपयांचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविण्यात आला असून, त्याला लवकरच मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.

या प्रस्तावात विमानतळाच्या धावपट्टीची दुरुस्ती करून नव्याने डांबरीकरण करण्याचे नियोजन आहे. तसेच रात्रीच्या वेळीही विमाने सुरक्षितपणे उड्डाण करू शकतील आणि लँडिंग करता येईल, यासाठी अत्याधुनिक प्रकाशयोजना उभारण्यात येणार आहे.

सुरक्षाव्यवस्थेला प्राधान्य

विमानतळाच्या परिसराभोवती भक्कम संरक्षक भिंत उभारण्यासह इतर आवश्यक सुरक्षा उपाययोजनाही करण्यात येणार आहेत. पायाभूत सुविधा आणि विमानतळाची सुरक्षितता या दोन्ही बाबींवर पहिल्या टप्प्यात विशेष भर देण्यात आला आहे.

बारामती विमानतळावर वैमानिक प्रशिक्षणासाठी वापरल्या जाणाऱ्या विमानांच्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर विमानतळाच्या सुरक्षेचा मुद्दा चर्चेत आला आहे. तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाल्यानंतर विमानतळावरील सुरक्षाव्यवस्थेबाबत आवश्यक उपाययोजना करण्यास प्रशासनाने वेग दिला आहे.

प्रत्यक्ष कामाला आणखी काही महिन्यांचा अवधी

पहिल्या टप्प्यातील कामांसाठी सुमारे ७० कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल. धावपट्टीच्या कामास प्रत्यक्ष सुरुवात होण्यासाठी आणखी काही महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.

अग्निशमन यंत्रणा सज्ज

विमानतळावरील आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी अद्ययावत अग्निशमन बंब तैनात करण्यात आले आहेत. त्याचबरोबर प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची कायमस्वरूपी नियुक्ती करण्यात आली असून, विमानतळाच्या सुरक्षाव्यवस्थेला अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने ही महत्त्वाची पावले मानली जात आहेत.

दीपक कपूर, उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, MADC, मुंबई यांनी सांगितले की, पहिल्या टप्प्यातील प्रस्तावामध्ये धावपट्टीचे नूतनीकरण, रात्रीची प्रकाशयोजना, संरक्षक भिंत आणि इतर आवश्यक सुरक्षा उपाययोजनांचा समावेश आहे.

पहिल्या टप्प्यातील प्रमुख कामे

– धावपट्टीची दुरुस्ती व नव्याने डांबरीकरण
– रात्रीच्या उड्डाण व लँडिंगसाठी अत्याधुनिक प्रकाशयोजना
– विमानतळाभोवती संरक्षक भिंत
– विमानतळाच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना
– आपत्कालीन परिस्थितीसाठी अग्निशमन यंत्रणा अधिक सक्षम करणे

बारामती विमानतळाच्या या आधुनिकीकरणामुळे भविष्यात विमानतळाची कार्यक्षमता आणि सुरक्षितता वाढण्यास मदत होणार असून, राज्य सरकारच्या मंजुरीकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Back to top button