बारामती सहकारी बँकेचा सभासदांना मोठा दिलासा! १० टक्के लाभांश जाहीर; १५.४८ कोटींचा निव्वळ नफा
“एक बटन दाबलं… अन् सभासदांच्या खात्यात १०% लाभांश!”

बारामती सहकारी बँकेचा सभासदांना मोठा दिलासा! १० टक्के लाभांश जाहीर; १५.४८ कोटींचा निव्वळ नफा
“एक बटन दाबलं… अन् सभासदांच्या खात्यात १०% लाभांश!”
बारामती वार्तापत्र
बारामती सहकारी बँकेची ६५वी वार्षिक सर्वसाधारण सभा सोमवार, २८ सप्टेंबर २०२६ रोजी राजमाता जिजाऊ सभागृह, बारामती येथे उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. सभेच्या सुरुवातीस दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तसेच दिवंगत मान्यवरांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
बँकेचे अध्यक्ष अॅड. शिरीष दत्तात्रय कुलकर्णी यांनी प्रास्ताविकात बँकेच्या आर्थिक कामगिरीचा आढावा मांडला. अहवाल वर्षात बँकेच्या ठेवी २,२८७ कोटी रुपये, तर कर्जवाटप १,४११ कोटी रुपये असल्याचे सांगण्यात आले. बँकेचे भांडवल पर्याप्तता प्रमाण १७.७८ टक्के असल्याची माहितीही सभेत देण्यात आली.
रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार एनपीए आणि इतर आयकर तरतुदी वजा केल्यानंतर बँकेला १५.४८ कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. विशेष म्हणजे बँकेचा नेट एनपीए शून्य टक्के असल्याचे सभेत नमूद करण्यात आले.
सभासदांना ८ टक्क्यांऐवजी १० टक्के लाभांश देण्याबाबत संचालक मंडळाने सकारात्मक विचार करावा, अशी सूचना उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवार यांनी केली. त्यानंतर संचालक मंडळाने तातडीने ही सूचना मान्य करत सभासदांना १० टक्के लाभांश देण्याची घोषणा केली. या निर्णयाचे सभासदांनी टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत केले. लाभांशाची रक्कम सभासदांच्या खात्यावर तातडीने जमा करण्यात आल्याचे प्रसिद्धीपत्रकात नमूद आहे.
डिजिटल बँकिंगवर भर
आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात ग्राहकांना यूपीआय, क्यूआर कोड बॉक्स, आरटीजीएस, एनईएफटी, ई-स्टॅम्पिंग, पॅनकार्ड काढण्याची सुविधा, मोबाईल बँकिंग, एसएमएस बँकिंग, फास्ट ट्रॅक पेमेंट, विमा सेवा तसेच वीज बिल भरणा यांसारख्या विविध सुविधा बँकेकडून उपलब्ध करून दिल्या जात असल्याचे सांगण्यात आले. वाढत्या ग्राहक प्रतिसादाचा विचार करून लवकरच आणखी ५ नवीन शाखा सुरू करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचेही नमूद करण्यात आले.
यामध्ये पुणे जिल्ह्यातील सासवड तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत येथे शाखा सुरू करण्याचा समावेश असल्याचे प्रसिद्धीपत्रकात नमूद आहे. बँकेचे कार्यक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्र राज्य करण्यासोबतच बँकेला शेड्यूल्ड दर्जा मिळविण्याचे आणि ग्राहकांसाठी इंटरनेट बँकिंग सुविधा उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्टही मांडण्यात आले.
आगामी अहवाल वर्षात ठेवी, कर्जवाटप आणि एकूण व्यवसायात वाढ करून बँकेची प्रगती साधण्याचा मानस व्यक्त करण्यात आला.
सभेचे कामकाज कार्यकारी संचालक विनोद रावळ यांनी विषयपत्रिका वाचून आणि बँकेचा अहवाल सादर करून सुरू केले. सभासदांनी सर्व विषय एकमताने मंजूर केले. बँकेच्या कामकाजाबद्दल अनेक सभासदांनी समाधान व्यक्त केले, तर सभासदांनी मांडलेल्या सूचनांवर अध्यक्ष अॅड. शिरीष कुलकर्णी यांनी स्पष्टीकरण दिले.
सभेला संबोधित करताना सुनेत्रावहिनी पवार यांनी बँकेच्या मागील पाच वर्षांतील प्रगतीबाबत समाधान व्यक्त केले. सहकाराच्या माध्यमातून बँकेची भक्कम वाटचाल सुरू असून, गरजू घटकांना कर्जवाटप करताना ठरविलेल्या निकषांचे पालन करावे आणि भविष्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करावा, अशा सूचना त्यांनी केल्या. बँक ही केवळ आर्थिक संस्था न राहता विश्वासाची संस्था म्हणून कार्यरत राहावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
सभेला बँकेच्या उपाध्यक्षा सौ. नुपूर शहा, तज्ज्ञ संचालक प्रितम पहाडे (सी.ए.), संचालक सचिन सातव, व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष उद्धव गावडे यांच्यासह संचालक मंडळ, व्यवस्थापन मंडळाचे सदस्य, कार्यकारी संचालक, अधिकारी, शाखाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. सभेचा समारोप राष्ट्रगीताने झाला. उपाध्यक्षा सौ. नुपूर शहा यांनी आभार प्रदर्शन केले.
ठळक मुद्दे :
- १५.४८ कोटी रुपये — निव्वळ नफा
- १० टक्के — सभासदांना लाभांश
- २,२८७ कोटी — ठेवी
- १,४११ कोटी — कर्जवाटप
- १७.७८% — भांडवल पर्याप्तता प्रमाण
- शून्य टक्के — नेट एनपीए
- ५ नवीन शाखांचा विस्ताराचा मानस






