इंदापूर

भिगवण ग्रामपंचायतीच्या रणधुमाळीला सुरुवात; ‘श्रीनाथ ग्राम विकास पॅनल’ ची घोषणा

ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची रंगत वाढली

भिगवण ग्रामपंचायतीच्या रणधुमाळीला सुरुवात; ‘श्रीनाथ ग्राम विकास पॅनल’ ची घोषणा

ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची रंगत वाढली

इंदापूर-सिद्धार्थ मखरे ( तालुका प्रतिनिधी )

इंदापूर तालुक्यातील सर्वात मोठ्या समजल्या जाणाऱ्या ग्रामपंचायती पैकी भिगवण ग्रामपंचायतीच्या रणधुमाळीला सुरुवात झालेली आहे.(दि. १५) रोजी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विरोधात ‘स्वर्गीय रमेश बापू जाधव’ प्रेरित ‘श्रीनाथ ग्राम विकास पॅनल’ ची घोषणा ज्येष्ठ नेते अशोकराव शिंदे यांनी केली.

यावेळी बोलताना अशोकराव शिंदे यांनी सांगितले की, सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पाच वर्षांपूर्वी ‘एक बदल घडवा सगळे बदल घडतील’. असे स्वप्न दाखवून भिगवण ग्रामपंचायतीची सत्ता काबीज केली. परंतु, या पाच वर्षांमध्ये भिगवणच्या विकासाच्या दृष्टीने कोणतेही बदल झालेले भिगवणकरांना दिसून आलेले नाहीत. परंतु सत्तेची संगीत खुर्ची करण्याचा सगळ्यात मोठा बदल सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केला आहे. सरपंच व उपसरपंच पदाची अवहेलना करण्याचे काम सत्ताधाऱ्यांनी पाच वर्षांमध्ये केले. जी काही विकास कामे झाली ती देखील निकृष्ट दर्जाची करण्यात आली.

श्रीनाथ ग्रामविकास पॅनल मध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन, भिगवणच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहणार आहे. विकास कामासाठी पक्षीय मतभेद बाजूला ठेवून ग्रामपंचायतीचा कारभार करणार आहोत. तसेच गावांमध्ये सामाजिक सलोखा राखून गावचे गाव पण जपण्यासाठी प्रयत्न करू व लोकाभिमुख, स्थिर कारभार करण्यावर भर देऊ. सामाजिक कामांमध्ये रस असणाऱ्या शांत व संयमी उमेदवारांना संधी देऊन स्वच्छ व पारदर्शक कारभार करण्यावर भर देणार असल्याचे देखील यावेळी बोलताना सांगितले.

या पत्रकार परिषदेसाठी अनेक ज्येष्ठ नेते व कार्यकर्ते उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक अजित क्षीरसागर यांनी केले. तर आभार गुलामभाई शेख यांनी मानले.

Check Also
Close
Back to top button