राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण ‘होय मुख्यमंत्रीच’, बारामतीमधील फ्लेक्सची जोरदार चर्चा
नेमकं काय घडतंय?

राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण ‘होय मुख्यमंत्रीच’, बारामतीमधील फ्लेक्सची जोरदार चर्चा
नेमकं काय घडतंय?
बारामती वार्तापत्र
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख नेत्या तथा राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी 2029 च्या निवडणुकीनंतर राज्याचं नेतृत्व करावं, त्या राज्याच्या मुख्यमंत्री व्हाव्यात, अशी इच्छा त्यांचे पुत्र जय पवार यांनी व्यक्त केली.
जय पवार यांनी माध्यमांसमोर अशी इच्छा व्यक्त केल्यानंतर राजकारणात विविध चर्चांना उधाण आलं आहे. विविध नेत्यांकडून जय पवार यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली जात आहे. भाजप नेते तथा ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी जय पवार यांना त्यांच्या वक्तव्यावरुन टोला लगावला आहे. मुख्यमंत्री होण्यासाठी आमदारांचं पाठबळ लागतं, असा टोला जयकुमार गोरे यांनी लगावला आहे. तसेच शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांनीदेखील जय पवार यांना टोला लगावला आहे. सुनेत्रा पवार पोटनिवडणुकीत जास्त मताधिक्याने निवडून आल्यामुळे जय पवार यांना तसे स्वप्न पडू लागले असतील, असा टोला भरत गोगावले यांनी लगावला आहे. याबाबत विविध प्रतिक्रिया राजकीय नेत्यांकडून दिल्या जात असतानाच आता बारामतीतला एका फ्लेक्सची जोरदार चर्चा होत आहे.
बारामती शहरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुनेत्रा पवार यांच्या समर्थनार्थ झळकलेल्या एका फ्लेक्समुळे राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले आहे. “माननीय सुनेत्रा वहिनी अजितदादा पवार… होय मुख्यमंत्रीच” तसेच “महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री म्हणून उभा महाराष्ट्र तुमच्याकडे पाहतोय”, असा आशय या फ्लेक्सवर छापण्यात आले आहे. या फ्लेक्सने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
जय पवार नेमकं काय म्हणाले होते?
विशेष म्हणजे, जय पवार यांनी केलेल्या वक्तव्यामुळे या चर्चांना आणखी हवा मिळाली आहे. “बारामतीकरांची इच्छा अजितदादांना मुख्यमंत्री म्हणून पाहण्याची होती. आता वहिनीही तितक्याच कष्टाने काम करत आहेत. २०२९ मध्ये त्या मोठी भूमिका बजावतील,” असे विधान जय पवार यांनी केल्यानंतर राजकीय चर्चांना सुरुवात झाली होती. त्याच पार्श्वभूमीवर बारामतीत झळकलेला हा फ्लेक्स अधिकच चर्चेचा विषय ठरत आहे.
फ्लेक्समध्ये सुनेत्रा पवार यांना महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्रीपदासाठी योग्य नेतृत्व असल्याचा विचार सर्वसामान्यांमध्ये बिंबवण्याचे प्रयत्न दिसून येत आहे. त्यामुळे आगामी काळात बारामतीसह राज्याच्या राजकारणात नवे समीकरण तयार होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, या फ्लेक्सबाबत अधिकृत राजकीय प्रतिक्रिया समोर आलेली नसली तरी सोशल मीडियावर आणि राजकीय वर्तुळात मात्र याची जोरदार चर्चा सुरू आहे.






