“विश्वास जिंकला अन् सत्य समोर आलं!” बारामती पोलिसांच्या संवेदनशील तपासामुळे मिसिंग तरुणी आई-वडिलांच्या कुशीत
मोबाईल, व्हिडिओ कॉल अन् धमकीचे आरोप

“विश्वास जिंकला अन् सत्य समोर आलं!”
बारामती पोलिसांच्या संवेदनशील तपासामुळे मिसिंग तरुणी आई-वडिलांच्या कुशीत
मोबाईल, व्हिडिओ कॉल अन् धमकीचे आरोप
बारामती वार्तापत्र
घरातील काही कारणांमुळे आई-वडिलांसोबत न राहता मैत्रिणीकडे राहण्याचे सांगून घराबाहेर पडलेली तरुणी अखेर बारामती शहर पोलिसांच्या प्रयत्नांमुळे सुरक्षितपणे सापडली. मात्र केवळ तरुणीचा शोध घेऊन न थांबता तिच्या घर सोडण्यामागील परिस्थिती समजून घेण्यासाठी महिला पोलिसांनी केलेल्या संवेदनशील संवादातून काही गंभीर आरोप समोर आले आहेत.
तरुणी घरी परत न आल्याने चिंतेत असलेल्या वडिलांनी बारामती शहर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. त्यानंतर मानव मिसिंग नं. ११८/२०२६, दि. १० सप्टेंबर २०२६ अशी नोंद करून पोलिसांनी तातडीने शोध सुरू केला.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती शहर पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेल्या विशेष मिसिंग पथकाने या प्रकरणाला गांभीर्याने घेतले. प्रभारी पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांच्या समन्वयातून महिला पोलीस हवालदार मोनिका मोहिते आणि ज्योती डीसले यांनी उपलब्ध तांत्रिक व मानवी माहितीच्या आधारे शोध घेतला. अखेर तरुणी सुरक्षितपणे मिळून आली.
शोध लागला; पण पोलिसांसमोर खरे आव्हान त्यानंतर!
तरुणी सापडल्यानंतर तिच्या घर सोडण्यामागील कारणे, तिच्यावर कोणाचा प्रभाव किंवा दबाव होता का, ती सुरक्षित आहे का आणि तिच्या निर्णयामागील वस्तुस्थिती काय आहे, याची पडताळणी करणे आवश्यक होते.
महिला पोलीस हवालदार मोनिका मोहिते यांनी तरुणीला विश्वासात घेत कोणताही दबाव न आणता संवेदनशील पद्धतीने संवाद साधला. या संवादात तरुणीने तिच्यासोबत घडलेल्या काही गंभीर घटनांची माहिती पोलिसांना दिल्याचे प्रेस नोटमध्ये नमूद करण्यात आले आहे.
तरुणीच्या कथनानुसार, कुटुंबीयांच्या ओळखीतील एका व्यक्तीने तिच्याशी जवळीक निर्माण करून तिला स्वतंत्र मोबाईल दिला. त्यानंतर फोन व व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून संपर्क ठेवत तिचा विश्वास संपादन केला आणि तिच्याकडे असलेल्या वैयक्तिक छायाचित्रांचा गैरवापर करण्याची धमकी दिल्याचा आरोप तिने केला.
त्यानंतर दुसऱ्या एका तरुणाने आपण सामाजिक संघटनेचा पदाधिकारी असल्याचे सांगून तिच्याशी संपर्क वाढविला. मदत व संरक्षण देण्याचे आश्वासन देत तिचा विश्वास संपादन केल्यानंतर प्रेम व लग्नाचे आश्वासन देऊन तिच्या परिस्थितीचा गैरफायदा घेतल्याचा आरोप तरुणीने चौकशीदरम्यान केल्याचे पोलिसांनी सांगितले.
कुटुंबापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न?
पोलिसांच्या पडताळणीत तरुणीला आई-वडिलांपासून वेगळे ठेवण्यासाठी स्वतंत्र राहण्याची व्यवस्था करण्याचा प्रयत्न झाल्याचा संशय निर्माण झाला. याशिवाय संबंधित तरुणाने ChatGPTच्या माध्यमातून तरुणीच्या आई-वडील व नातेवाईकांविरोधात, त्यांच्यापासून धोका असल्याचा आशय असलेला अर्ज तयार केल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आल्याचे प्रेस नोटमध्ये नमूद आहे.
या अर्जामागील नेमका हेतू काय होता, तसेच तरुणीच्या निर्णयावर कोणाचा प्रभाव किंवा दबाव होता का, याची कायदेशीर पडताळणी करण्यात येत आहे.
पोलिसांनी निर्णय लादला नाही!
या संपूर्ण प्रकरणात पोलिसांनी तरुणीवर कोणताही निर्णय लादला नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. महिला पोलीस कर्मचारी, महिला नागरिक, ज्येष्ठ नागरिक, विधिज्ञ आणि सामाजिक क्षेत्रातील जबाबदार व्यक्तींच्या उपस्थितीत तिच्याशी संवाद साधण्यात आला.
तिच्या आई-वडिलांनाही मुलीच्या भावनिक परिस्थितीचा आदर करून संयमाने वागावे, दबाव आणू नये आणि तिच्या सुरक्षिततेची काळजी घ्यावी, अशी समज देण्यात आली.
दीर्घ संवाद आणि समुपदेशनानंतर तरुणीने स्वतःच्या इच्छेने आई-वडिलांसोबत घरी जाण्याचा निर्णय घेतला.
अखेर आईची मिठी… अन् कुटुंबाचा जीव भांड्यात पडला!
मुलगी सुरक्षित असल्याचे समजताच अनेक तास चिंतेत असलेल्या आई-वडिलांचा जीव भांड्यात पडला. तरुणीने आईला मिठी मारताच कुटुंबातील तणावाचे वातावरण भावनिक क्षणात बदलले.
विशेष मिसिंग पथकाचे शोधकार्य, महिला पोलिसांचा संवेदनशील संवाद आणि समुपदेशनाच्या माध्यमातून अखेर तरुणी सुरक्षितपणे आई-वडिलांच्या कुशीत परतली.
ही कार्यवाही पोलीस अधीक्षक श्री. संदीपसिंग गिल, अपर पोलीस अधीक्षक श्री. गणेश बिरादार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. चैतन्य कदम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
प्रभारी पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांच्या समन्वयाने महिला पोलीस हवालदार मोनिका मोहिते व ज्योती डीसले यांनी प्रकरणात विशेष प्रयत्न केले.






