सोमेश्वर

सोमेश्वरचा नवा कारभारी ठरला! राजवर्धन शिंदे अध्यक्ष; संग्राम सोरटे उपाध्यक्ष!

अनुभवी नेतृत्वावर पुन्हा विश्वास जबाबदारी!

सोमेश्वरचा नवा कारभारी ठरला!
राजवर्धन शिंदे अध्यक्ष; संग्राम सोरटे उपाध्यक्ष!

अनुभवी नेतृत्वावर पुन्हा विश्वास जबाबदारी!

बारामती | प्रतिनिधी

बारामती तालुक्यासह पुणे आणि सातारा जिल्ह्यातील सहकार क्षेत्राचे लक्ष लागून राहिलेल्या श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडीचा अखेर फैसला झाला आहे. कारखान्याच्या अध्यक्षपदी राजवर्धन शिंदे यांची, तर उपाध्यक्षपदी नवनाथ उद्योग समूहाचे अध्यक्ष संग्राम सोरटे यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीमुळे सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या नव्या नेतृत्वाची दिशा स्पष्ट झाली आहे.

कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने २१ पैकी २१ जागांवर विजय मिळवत निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले होते. या ऐतिहासिक विजयानंतर अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडीकडे सभासदांसह राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते.

राजवर्धन शिंदेंवर पुन्हा विश्वास!

अध्यक्षपदासाठी राजवर्धन शिंदे, प्रमोद काकडे, संग्राम सोरटे, सुनील भगत, अभिजित काकडे, ऋषिकेश गायकवाड, विक्रम भोसले आणि उत्तम धुमाळ या नावांची चर्चा सुरू होती. अखेर अध्यक्षपदासाठी राजवर्धन शिंदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

राजवर्धन शिंदे यांनी यापूर्वी दोन वेळा कारखान्याचे अध्यक्षपद भूषविले आहे. त्यामुळे कारखान्याच्या कामकाजाचा अनुभव आणि सहकार क्षेत्रातील त्यांची जाण लक्षात घेता त्यांच्यावर पुन्हा अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

उपाध्यक्षपदी संग्राम सोरटे!

नवनाथ उद्योग समूहाचे अध्यक्ष संग्राम सोरटे यांची कारखान्याच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. अध्यक्षपदाच्या चर्चेतही त्यांचे नाव आघाडीवर होते. मात्र, आता उपाध्यक्षपदाची जबाबदारी त्यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.

राजवर्धन शिंदे आणि संग्राम सोरटे यांच्या नेतृत्वाखाली सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची आगामी वाटचाल कशी राहणार, याकडे सभासदांचे लक्ष लागले आहे.

सोमेश्वरच्या नव्या नेतृत्वाकडून अपेक्षा वाढल्या!

२१ पैकी २१ जागांवर विजय मिळविल्यानंतर आता कारखान्याच्या नव्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षांकडून सभासदांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. कारखान्याची आर्थिक स्थिती, ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे हित, ऊस गाळप क्षमता, आधुनिकीकरण आणि कारखान्याच्या विकासाला गती देण्याचे आव्हान नव्या नेतृत्वासमोर असणार आहे.

सोमेश्वरच्या अध्यक्षपदी राजवर्धन शिंदे आणि उपाध्यक्षपदी संग्राम सोरटे यांची निवड झाल्याने कारखान्याच्या नव्या नेतृत्वाचा अध्याय सुरू झाला आहे.

Back to top button