सोमेश्वरच्या निवडणुकीवर सुप्रिया सुळेंचा स्पष्ट संदेश; ‘कारखाना अन् शेतकरी केंद्रस्थानी ठेवा’
बिनविरोध निवडणूक झाली तर आनंदच; मात्र...

सोमेश्वरच्या निवडणुकीवर सुप्रिया सुळेंचा स्पष्ट संदेश; ‘कारखाना अन् शेतकरी केंद्रस्थानी ठेवा’
बिनविरोध निवडणूक झाली तर आनंदच; मात्र…
बारामती वार्तापत्र
श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ‘सोमेश्वर कारखाना केंद्रबिंदू ठेवून सर्वांनी काम करावे. कारखाना आणि बळीराजाचा विकास हाच सर्वांचा मुख्य उद्देश असला पाहिजे,’ असे आवाहन त्यांनी केले.
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, सोमेश्वर कारखाना हा महाराष्ट्राच्या सहकार चळवळीतील महत्त्वाचा स्तंभ आहे. त्यामुळे कारखान्याच्या कामकाजात राजकारणापेक्षा सहकार आणि शेतकऱ्यांचे हित यांना प्राधान्य मिळणे आवश्यक आहे. कारखाना योग्य आणि पारदर्शक पद्धतीने चालवणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असल्याचे त्यांनी नमूद केले.
बिनविरोध निवडणूक झाली तर आनंदच; मात्र…
आगामी निवडणुकीबाबत बोलताना सुळे यांनी सर्वांना एकत्र घेऊन पुढे जाण्याचा प्रयत्न असल्याचे सांगितले. सर्वांच्या सहमतीने आणि एकमताने निर्णय झाला तर तो आनंदाचा क्षण असेल; मात्र चर्चेतून तोडगा निघाला नाही, तर लोकशाही मार्गाने निवडणूक लढविण्याशिवाय पर्याय नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, कारखान्याच्या संदर्भात सभासद आणि शेतकऱ्यांमध्ये निर्माण झालेली अस्वस्थता ही चिंतेची बाब असल्याचेही त्यांनी सांगितले. शेतकरी, सभासद आणि कारखान्याचे हित केंद्रस्थानी ठेवून निर्णय होणे गरजेचे आहे, अशी भूमिका त्यांनी मांडली.
व्हायरल पोस्टवर मिश्किल टोला!
यावेळी एका राजकीय नेत्याच्या सोशल मीडिया पोस्टबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ‘आधी ती पोस्ट मला दाखवा,’ असा मिश्किल आग्रह सुप्रिया सुळे यांनी धरला. संबंधित पोस्ट डिलीट करण्यात आल्याचे पत्रकारांनी सांगितल्यानंतर उपस्थितांमध्ये हशा पिकला.
सोमेश्वर कारखान्याची आगामी निवडणूक बिनविरोध होणार की निवडणुकीचा सामना रंगणार? याकडे आता सभासदांसह बारामती तालुक्याचे लक्ष लागले आहे.






