सोमेश्वर

सोमेश्वर साखर कारखान्याची निवडणूक तापली! राष्ट्रवादींची काटे की टक्कर; शिवसेना-भाजपही मैदानात

शेतकरी पॅनेलमुळे निवडणुकीत रंगत

सोमेश्वर साखर कारखान्याची निवडणूक तापली!
राष्ट्रवादींची काटे की टक्कर; शिवसेना-भाजपही मैदानात

शेतकरी पॅनेलमुळे निवडणुकीत रंगत

बारामती वार्तापत्र 

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर होणाऱ्या सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या पहिल्याच निवडणुकीला राजकीय रंग चढला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार), शिवसेना (शिंदे), शिवसेना (ठाकरे) आणि भाजप अशा विविध गटांकडून स्वतंत्रपणे निवडणूक लढविण्याची तयारी सुरू असल्याने पंचरंगी लढतीची शक्यता निर्माण झाली आहे.

पुणे जिल्ह्यातील चार तालुक्यांत कार्यक्षेत्र आणि सुमारे २१ हजार सभासद असलेल्या या कारखान्याची निवडणूक सहकार क्षेत्राबरोबरच बारामतीच्या राजकारणासाठीही महत्त्वाची मानली जात आहे. अजित पवार यांच्या नेतृत्वामुळे कारखान्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व राहिले होते. त्यांच्या निधनानंतर ही पहिलीच निवडणूक होत असल्याने सर्वच राजकीय गटांनी जोरदार तयारी सुरू केली आहे.

शेतकरी पॅनेलचीही एन्ट्री

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी शेतकरी मेळावे घेत निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाकडून युवा नेते जय पवार यांनीही पक्षाच्या ‘शेतकरी पॅनेल’कडून निवडणूक लढविण्याचे संकेत दिले आहेत.

दरम्यान, युगेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखालीही ‘शेतकरी पॅनेल’ उभे राहण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांतील संघर्ष अधिक रंगण्याची चिन्हे आहेत.

भाजप-शिवसेनाही स्वतंत्र मैदानात

भाजपनेही स्वतंत्र पॅनेल उभे करण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त आहे. निंबूत येथे शेतकरी सभासदांचा मेळावा घेत भाजपने निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. जिल्हाध्यक्ष शेखर वडणे यांनी सर्व जागा लढविण्याची घोषणा केली आहे.

शिवसेना (शिंदे) पक्षाकडून आमदार विजय शिवतारे यांनी निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला असून, शिवसेना (ठाकरे) पक्षानेही स्वतंत्रपणे निवडणुकीची तयारी सुरू केली आहे.

११ सप्टेंबरपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत असून, ३० सप्टेंबरपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत. त्यामुळे अंतिम चित्र स्पष्ट झाल्यानंतर सोमेश्वरच्या निवडणुकीत नेमकी किती पॅनेल आणि कोणते चेहरे आमनेसामने येतात, याकडे बारामतीसह संपूर्ण पुणे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Back to top button