क्राईम रिपोर्ट

“हनी ट्रॅपच्या जाळ्यात अडकवून अॅट्रॉसिटी कायद्याच्या धमकीवर खंडणी उकळण्याचा प्रकार उघड – बारामती पोलिसांची मोठी कारवाई”

सुमारे ₹50,00,000/- इतक्या रकमेची मागणी

“हनी ट्रॅपच्या जाळ्यात अडकवून अॅट्रॉसिटी कायद्याच्या धमकीवर खंडणी उकळण्याचा प्रकार उघड – बारामती पोलिसांची मोठी कारवाई”

सुमारे ₹50,00,000/- इतक्या रकमेची मागणी

बारामती वार्तापत्र 

बारामती शहर पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. 142/2026, भा. न्या. सं. कलम 308(2), 308(7), 356(2), 352, 3(5) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला असून, सदर गुन्हा हा अत्यंत नियोजित व संगनमताने रचलेला हनी ट्रॅपच्या माध्यमातून फसवणूक करून अॅट्रॉसिटी कायद्याच्या भीतीचा गैरवापर करत खंडणी उकळण्याचा प्रकार असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.

फिर्यादी हे शासकीय सेवेत कार्यरत अधिकारी असून, त्यांचा परिचय बारामती येथील प्रशिक्षण केंद्रात गेस्ट लेक्चरर म्हणून येत असताना काही व्यक्तींशी झाला होता. त्यानंतर एका महिलेकडून वारंवार फोन व व्हिडिओ कॉलद्वारे संपर्क साधण्यात येत होता. सुरुवातीला मार्गदर्शनाच्या नावाखाली संवाद सुरू करण्यात आला; मात्र पुढे हा संवाद जाणीवपूर्वक ओळख वाढवून जाळ्यात ओढण्याच्या उद्देशाने करण्यात येत असल्याचे दिसून आले.

फिर्यादी यांनी संशय आल्याने संबंधित मोबाईल क्रमांक ब्लॉक केला असता, दुसऱ्या मोबाईल क्रमांकावरून संपर्क साधून संवाद सुरू ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला.

काही कालावधीनंतर फिर्यादी यांच्यासोबत झालेल्या व्हिडिओ कॉलचे स्क्रीन रेकॉर्डिंग करून ते व्हायरल करण्याची धमकी देत बदनामी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यानंतर संबंधित व्यक्ती व तिच्या साथीदारांनी संगनमताने फिर्यादी यांना खोट्या बलात्कार व अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची भीती दाखवून मोठ्या रकमेची मागणी सुरू केली. सुरुवातीला सुमारे ₹50,00,000/- इतक्या रकमेची मागणी करण्यात आली असून पुढे ती टप्प्याटप्प्याने कमी करून ₹25,00,000/- व त्यानंतर ₹10,00,000/- पर्यंत आणण्यात आली असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

पुरवणी जबाबानुसार, आरोपींकडून फिर्यादी यांना विविध वेळेस मोबाईल कॉलद्वारे धमक्या देण्यात आल्या असून दि. 05/04/2026 रोजी ते दि. 13/04/2026 रोजी दरम्यान एकूण सहा वेळा कॉलद्वारे संपर्क साधून खंडणी स्वरूपात पैशांची मागणी करण्यात आली असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.

फिर्यादी यांचा मोबाईल iPhone असल्यामुळे कॉल रेकॉर्डिंगची सुविधा उपलब्ध नसल्याने त्यांनी कॉल स्पीकरवर ठेवून दुसऱ्या मोबाईलद्वारे संपूर्ण संभाषणाचे ऑडिओ-व्हिज्युअल स्वरूपात रेकॉर्डिंग केले असून, सदर रेकॉर्डिंगमध्ये आरोपीकडून “तुम्हाला वाचायचे असेल तर पैसे द्या”, “नाही दिल्यास बलात्कार व अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करतो”, “मीडियात आणून बदनामी करतो” अशा स्पष्ट व धमकीजन्य विधानांचा समावेश असल्याचे आढळून आले आहे.

तसेच आरोपींकडून दबाव वाढवत तातडीने ₹1,00,000/- रक्कम उकळण्यात आली असल्याचे तपासात निष्पन्न झाले असून सदर रक्कम मध्यस्थांच्या माध्यमातून बारामती MIDC परिसरातील पेट्रोल पंपाजवळ देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. पुढे फिर्यादी यांना प्रत्यक्ष भेटीस बोलावून, वाहनात बसवून मोबाईल तपासून, सुमारे दोन तासांहून अधिक काळ दमदाटी व मानसिक दबाव आणत पुन्हा मोठ्या रकमेची मागणी करण्यात आली. आरोपींकडून स्पष्टपणे पैसे न दिल्यास खोटा बलात्कार व अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल करून नोकरी घालवणे व सामाजिक बदनामी करणे अशा प्रकारच्या धमक्या देण्यात आल्याचे तपासात उघड झाले आहे.

सदर प्रकरणात आरोपींकडून हनी ट्रॅप, व्हिडिओ रेकॉर्डिंग, ब्लॅकमेलिंग, अॅट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर, खंडणी मागणी अशा क्रमाने गुन्हेगारी कारवाई करण्यात आल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. तपासादरम्यान फिर्यादीकडील सर्व डिजिटल पुरावे जप्त करून त्यांचा Hash Value पंचनामा करण्यात आलेला असून पुढील तांत्रिक तपासामध्ये आवाजाची वैज्ञानिक पडताळणी (FSL Voice Comparison), CCTV फुटेजचे विश्लेषण तसेच कॉल डिटेल रेकॉर्ड (CDR) तपास सुरू आहे.

अपरिचित व्यक्तींशी सोशल मीडिया अथवा व्हिडिओ कॉलद्वारे वैयक्तिक संपर्क ठेवणे टाळावे. कोणतीही खाजगी माहिती, फोटो अथवा व्हिडिओ शेअर करू नयेत. “हनी ट्रॅप” अथवा “ब्लॅकमेल” प्रकार आढळल्यास त्वरित पोलीसांशी संपर्क साधावा. तसेच अॅट्रॉसिटी कायदा किंवा इतर गंभीर कायद्यांचा गैरवापर करून कोणी धमकी देत असल्यास घाबरून न जाता तत्काळ कायदेशीर मदत घ्यावी.

सदर गुन्ह्याचा तपास मा. पोलीस अधीक्षक श्री संदीप सिंह गिल्ल, मा. पोलीस उप अधीक्षक श्री गणेश बिरादार, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. श्री सुदर्शन राठोड व प्रभारी पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस उपनिरीक्षक श्री रत्नदीप भंडारे, पोलीस शिपाई अक्षय सिताफ, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक श्री संदीप जाधव, पोलीस हवालदार श्री रामचंद्र शिंदे, पोलीस शिपाई गिरीश नेवसे, पोलीस शिपाई विशाल शिंदे व पोलीस शिपाई संतोष जगताप यांनी केलेला आहे.

प्रभारी पोलीस निरीक्षक
बारामती शहर पोलीस स्टेशन

 

Check Also
Close
Back to top button