एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाची कोंडी कायम, दुसरीकडे 6895 कर्मचारी कामावर
कोर्टानं नेमलेली समिती आणि एसटी संघटनांची आज बैठक होणार आहे.
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाची कोंडी कायम, दुसरीकडे 6895 कर्मचारी कामावर
कोर्टानं नेमलेली समिती आणि एसटी संघटनांची आज बैठक होणार आहे.
प्रतिनिधी
राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाची कोंडी कायम आहे. मुंबई उच्च न्यायालयाने संप बेकायदेशीर ठरवले आहे. तसेच राज्य सरकारकडून संप मागे घेण्याचे आवाहन केले. असेत असताना संपच सुरुच आहे. उच्च न्यायालयाने नेमलेल्या समितीसोबत आज एसटी संघटनांची बैठक होणार आहे. त्यामुळे या बैठकीत तोडगा निघणार का, याची उत्सुकता आहे. तर न्यायालयाने 22 नोव्हेंबरपर्यंत सुनावणी पुढे ढकलली आहे. तर दुसरीकडे 6895 कर्मचारी कामावर हजर झाल्याचा दावा एसटी महामंडळाने केला आहे.
एसटी महामंडळाचा दावा
राज्यातल्या विविध एसटी आगारांमध्ये सोमवारी 6 हजार 895 कर्मचारी कामावर हजर होते, असे एसटी महामंडळानं सांगितले. हजेरी पटावरील एकूण कर्मचाऱ्यांची संख्या 92 हजार 266 इतकी आहे. एसटी आगारांतून दुपारी चार वाजेपर्यंत 51 एसटी बसेस बाहेर पडल्या. त्यातून 1 हजार 317 प्रवाशांनी प्रवास केल्याचे महामंडळाने म्हटलंय.
संप मागे घ्या, चर्चा करु -परब
एसटी संपाची कोंडी कायम आहे. संप मागे घ्या, चर्चा करु आणि प्रश्न सोडवू, असे आवाहन पुन्हा एकदा अनिल परब यांनी केले आहे. तर विलिनीकरण शक्य नाही, योग्य पर्याय काढायला पाहिजे, असं शरद पवारांनी म्हटलंय. कोर्टानं नेमलेली समिती आणि एसटी संघटनांची आज बैठक होणार आहे. राज्याचे मुख्य सचिव आणि या समितीचे अध्यक्ष सीताराम कुंटे यांनी संध्याकाळी मंत्रालयात बैठक बोलावली आहे.
एसटी महामंडळाने कामगार संघटनेवर न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी याचिका दाखल केली आहे. एसटी कर्मचाऱ्यांना आत्महत्या करण्यापासून रोखा, अशी सूचना सुनावणीवेळी उच्च न्यायालयाने केली. संपासंदर्भातली पुढची सुनावणी 22 नोव्हेंबरला होणार आहे.