बारामती खरेदी-विक्री संघाचे ऐतिहासिक नामांतर; आता ‘अजितदादा पवार बारामती तालुका सहकारी खरेदी-विक्री संघ’ म्हणून ओळख
दूरदृष्टीमुळे खरेदी-विक्री संघाचे कामकाज अधिक सक्षम

बारामती खरेदी-विक्री संघाचे ऐतिहासिक नामांतर; आता ‘अजितदादा पवार बारामती तालुका सहकारी खरेदी-विक्री संघ’ म्हणून ओळख
दूरदृष्टीमुळे खरेदी-विक्री संघाचे कामकाज अधिक सक्षम
बारामती वार्तापत्र
बारामती तालुक्यातील सहकार क्षेत्रातील एक महत्त्वाचा आणि ऐतिहासिक निर्णय आज घेण्यात आला. शेतकऱ्यांचा कणा समजल्या जाणाऱ्या बारामती तालुका सहकारी खरेदी-विक्री संघाचे नामांतर करून आता या संस्थेला ‘अजितदादा पवार बारामती तालुका सहकारी खरेदी-विक्री संघ’ असे नाव देण्याचा एकमताने निर्णय संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.
आज पार पडलेल्या संचालक मंडळाच्या विशेष आणि महत्त्वपूर्ण बैठकीत हा निर्णय सर्वानुमते मंजूर करण्यात आला. यावेळी संघाचे अध्यक्ष अॅड. रवींद्र माने, उपाध्यक्ष नितीन देवकाते, व्यवस्थापक नीलेश लोणकर यांच्यासह सर्व संचालक उपस्थित होते. बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना संचालक मंडळाने या निर्णयाची सविस्तर माहिती दिली.
अजित पवार यांच्या कार्याचा गौरव बारामती तालुक्यातील सहकार, कृषी आणि ग्रामीण विकासाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दिलेल्या योगदानाच्या गौरवार्थ हा निर्णय घेण्यात आल्याचे संचालक मंडळाने स्पष्ट केले.
अजित पवार यांनी आपल्या सार्वजनिक व राजकीय जीवनाची सुरुवात याच खरेदी-विक्री संघाच्या कार्यालयातून केली होती. सुरुवातीच्या काळात ते याच ठिकाणी बसून शेतकरी, कामगार आणि स्थानिक नागरिकांचे प्रश्न समजून घेत असत व त्यावर तोडगा काढत असत, अशी आठवण यावेळी संचालकांनी करून दिली.
सहकार क्षेत्रातील अजितदादांचे योगदान अजितदादा पवार यांनी सहकार क्षेत्रातूनच आपल्या सार्वजनिक जीवनाचा पाया घातला. त्यांच्या नेतृत्वाखाली बारामतीतील सहकारी संस्थांनी केवळ राज्यातच नव्हे, तर राष्ट्रीय पातळीवरही वेगळी ओळख निर्माण केली आहे.
सहकारी संस्थांच्या वार्षिक सभांमध्ये ते सातत्याने उपस्थित राहत संस्थांच्या कामकाजाचा आढावा घेत होते. बदलत्या काळानुसार संस्थांनी टिकून राहण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर, पारदर्शकता आणि आधुनिक व्यवस्थापन पद्धती अंगीकाराव्यात, असे मार्गदर्शन त्यांनी वेळोवेळी केले.
त्यांच्या दूरदृष्टीमुळे खरेदी-विक्री संघाचे कामकाज अधिक सक्षम, पारदर्शक आणि आधुनिक झाले असून, याच योगदानाच्या सन्मानार्थ संस्थेच्या नामांतराचा निर्णय घेण्यात आल्याचे संचालक मंडळाने नमूद केले.






