राजकीय

पुणे आणि बीडच्या पालकमंत्रीपदी उपमुख्यमंत्री; सुनेत्रा पवारच

प्रकल्प पूर्ण करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी सुनेत्रा पवार यांच्याच नावाचा आग्रह

पुणे आणि बीडच्या पालकमंत्रीपदी उपमुख्यमंत्री; सुनेत्रा पवारच

प्रकल्प पूर्ण करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी सुनेत्रा पवार यांच्याच नावाचा आग्रह

बारामती वार्तापत्र 

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारामती येथे विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. त्यानंतर प्रशासकीय कामात खंड पडू नये यासाठी राज्य सरकारने मंत्रिमंडळात मोठे बदल केले आहेत.

अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या उपमुख्यमंत्री पदावर सुनेत्रा पवार यांची वर्णी लागली आहे. तर त्यांच्याकडे आता पुणे आणि बीड या दोन्ही जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद सोपवण्यात आले आहे.

पुणे जिल्हा हा अजित पवारांचा बालेकिल्ला मानला जात होता. या जिल्ह्याचा विकास आणि प्रशासनावर त्यांची पकड होती. तोच वारसा पुढे नेण्यासाठी सुनेत्रा पवार यांची पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

बीड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावरून महायुतीत अनेक चर्चा सुरू होत्या. मात्र,अजित पवारांनी सुरू केलेले प्रकल्प पूर्ण करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी सुनेत्रा पवार यांच्याच नावाचा आग्रह धरला होता, ज्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली.

अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार गट) नेतृत्वाचा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र, पक्षाने एकमताने सुनेत्रा पवार यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड केली. त्यानंतर राज्य सरकारने त्यांच्याकडे उपमुख्यमंत्री पदासह अजित पवारांकडे असलेली महत्त्वाची खाती आणि जिल्ह्यांचे पालकत्व देण्याचा निर्णय घेतला आहे.

पुणे आणि बीड हे दोन्ही जिल्हे राजकीयदृष्ट्या अत्यंत संवेदनशील आहेत. पुण्यात पायाभूत सुविधांचे प्रकल्प मार्गी लावणे आणि बीडमधील राजकीय समीकरणे हाताळणे आणि कायदा सुव्यवस्था संभाळणे हे सुनेत्रा पवार यांच्यासमोरील मुख्य आव्हान आहे.

Back to top button