स्थानिक

“एक हात दादांच्या स्वच्छ-सुंदर बारामतीसाठी” : बारामती स्पोर्ट्स फाउंडेशनच्या स्वच्छता अभियानाचा शुभारंभ

शहरातील वेगवेगळे विभाग या उपक्रमांतर्गत दर रविवारी

“एक हात दादांच्या स्वच्छ-सुंदर बारामतीसाठी” : बारामती स्पोर्ट्स फाउंडेशनच्या स्वच्छता अभियानाचा शुभारंभ

शहरातील वेगवेगळे विभाग या उपक्रमांतर्गत दर रविवारी

बारामती वार्तापत्र

बारामती शहराला स्वच्छ, सुंदर आणि सुव्यवस्थित स्वरूप देणारे शिल्पकार व महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार साहेब यांच्या अकाली निधनाने संपूर्ण बारामती शोकसागरात बुडाली आहे.

अजितदादांच्या स्वप्नातील स्वच्छ व सुंदर बारामती कायम जपली जावी, या उद्देशाने बारामती स्पोर्ट्स फाउंडेशनच्या वतीने “एक हात दादांच्या स्वच्छ-सुंदर बारामतीसाठी” या उपक्रमांतर्गत दर रविवारी सकाळी ६ ते ८ या वेळेत स्वच्छता अभियान राबवण्याचा संकल्प करण्यात आला असून, या उपक्रमाचा शुभारंभ आज पार पडला.

या उपक्रमामागील संकल्पना विशद करताना बारामती स्पोर्ट्स फाउंडेशनचे संस्थापक सतीश ननवरे यांनी सांगितले की,
“अजितदादांनी बारामतीला नेहमीच स्वच्छता, शिस्त आणि विकासाची दिशा दिली.

हा उपक्रम केवळ स्वच्छता करण्यापुरता मर्यादित नसून नागरिकांमध्ये शिस्त, जबाबदारी आणि जागरूकता निर्माण करण्यासाठी आहे. आपण स्वच्छता कामगार नाही, तर समाजाला संदेश देण्यासाठी पुढे आलो आहोत. जर नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे, गुटखा खाऊन थुंकणे थांबवले, तर प्रशासनाची कामे अधिक सोपी होतील.

“जसे आपण आपल्या घरात कुठेही थुंकत नाही, तशीच बारामती हे आपले सामूहिक घर आहे. डिव्हायडरवर, फुटपाथवर, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, नियमबाह्य पार्किंग, नो-एंट्रीमध्ये वाहन चालवणे या सवयी बदलण्याची गरज आहे. परदेशात जशी शिस्त अपेक्षित धरली जाते, तशीच शिस्तप्रिय आणि नियमपालक बारामती हीच अजितदादांना अभिप्रेत होती.

दादा आज आपल्यात नसले तरी प्रत्येक बारामतीकरामध्ये एक ‘दादा’ जिवंत आहे. त्यांच्या विचारांना कृतीत उतरवण्यासाठी हीच योग्य वेळ असून सर्वांनी एकजुटीने पुढे यावे,” असेही त्यांनी नमूद केले.

या उपक्रमास शुभेच्छा देताना नगराध्यक्ष सचिन सातव यांनी सांगितले की,“स्व. अजितदादांनी नेहमीच बारामती सर्वांग सुंदर राहील याची शेवटच्या श्वासापर्यंत काळजी घेतली. स्वच्छतेसाठी केवळ प्रशासन नव्हे तर नागरिकांचा सक्रिय सहभाग महत्त्वाचा आहे. बारामती स्पोर्ट्स फाउंडेशनचा हा उपक्रम प्रेरणादायी असून नगरपरिषद याला पूर्ण सहकार्य करेल.”

आजच्या स्वच्छता अभियानात तीन हत्ती चौक परिसरातील डिव्हायडरची स्वच्छता, फुटपाथची स्वच्छता तसेच नगरपरिषद प्रशासकीय इमारतीचा परिसर स्वच्छ करण्यात आला.
येत्या काळात बारामती शहरातील वेगवेगळे विभाग या उपक्रमांतर्गत दर रविवारी स्वच्छ केले जाणार असल्याचा निर्धार बारामती स्पोर्ट्स फाउंडेशनने व्यक्त केला आहे. तसेच पुढील रविवारी (दि. १५) सकाळी ६ ते ८ या वेळेत महाराष्ट्रच नाही तर देशात रोल मॉडेल बस स्थानक म्हणून नावारूपाला आलेल्या बारामती बस स्थानक परिसरात स्वच्छता व जनजागृती अभियान राबवण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

या उपक्रमात नगराध्यक्ष सचिन सातव, उपनगराध्यक्ष श्वेता नाळे, नगरसेवक सुरज सातव, राजेंद्र सोनवणे, विशाल हिंगणे, बिरजू मांढरे, अनुप्रिया डांगे, सविता जाधव, ट्रॅफिक स्वयंसेवक यांच्यासह बारामती स्पोर्ट्स फाउंडेशनचे सदस्य आणि बारामतीकर नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Back to top button